कर्जत तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

कर्जत : मुंबईवरून (वाशी) सुनेसोबत तिच्या माहेरी राशीनला आलेल्या वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेला असून येथील नागरिक

कर्जत :  मुंबईवरून (वाशी) सुनेसोबत तिच्या माहेरी राशीनला आलेल्या  वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  त्यामुळे  कर्जत तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेला असून येथील नागरिक भयभीत झाले आहेत. सदर महिलेला  विलगीकरण कक्षात ठेवले होते. परंतु या महिलेचा उपचारासाठी नगरला जात असताना रुग्णवाहिकेत कोरोनानेच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले,तिच्या स्वॅबचा अहवाल सकारात्मक आला असल्याने राशीनसह परिसराचे धाबे दणाणले आहेत.

मुंबईहून संबंधित महिला खासगी वाहनाने आपल्या सुनेसोबत आली होती. तिच्या सुनेच्या घरी, तसेच दोन दिवस राशीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर १६ मे ला तपासणीसाठी नगर जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर  त्यांच्या नातेवाईकांच्या घरी ही महिला राहिली होती. या महिलेच्या संपर्कात ग्रामपंचायतीचे कर्मचारी, तिचे नातेवाईक, नातेवाईकांकडे असलेले कामगार, आणि राशीनमधील एक खासगी रुग्णालयातील डॉक्टर आले आहेत.

राशीन सील

या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी उद्या राशीन बंद ठेवण्यासोबत संबंधित महिला वास्तव्यास असलेला भाग सील करण्यास सांगितले आहे. तिच्या संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी म्हणून पुढील तपासणीसाठी कर्जतला नेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहेमृत महिला राहिलेल्या वसाहतीला सील करण्यात आले आहे. धडक कृती दलाच्या पथकाने राशीनच्या प्रत्येक रस्त्यावर कडक बंदोबस्त ठेवला आहे.

गावपातळीवर नेमणुकीस असलेले वैद्यकीय अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पोलीस अधिकारी हे संबंधित गावात राहत नाहीत. केवळ मिटिंगाचे कागदपत्र रंगवतात. त्यामुळे अशा कठीणप्रसंगी कोणाचा कोणावरच अंकुश राहत नाही. पर्यायाने कारभार ढिसाळ होतोच याला राशीनही अपवाद राहिलेले नाही. राशीन ग्रामपंचायतीने वारंवार मिटिंगा घेऊन बाजारपेठेचे नियोजन केले. मात्र बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना आणि चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यात अपयश आल्याने या मीटिंगा केवळ फार्स ठरल्या.

नुकतेच जामखेड कोरोनामुक्त झाले असतानाच कर्जत तालुक्यातील राशीनला कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा बळी गेल्याने संपूर्ण कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. यावर प्रशासनाने कठोर आणि तातडीने उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.

जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार

दि. १६ मे रोजी सदर महिलेची तब्येत बिघडल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पंरतु तिला परत पाठविण्यात आले होते. जर त्याचवेळी मृत महिलेची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून तेथेच उपचार केले असते तर कर्जत तालुक्यातील राशीन गावात कोरोनाच्या प्रवेशास अटकाव बसला असता. आणि त्या महिलेचे प्राणही वाचले असते. मात्र, दुर्दैवाने तसे घडले नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.