‘भूगोल’च्या गुणांबाबतचा फॉर्म्युला अखेर निश्‍चित

पुणे: करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे रद्द करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या भूगोल विषयाच्या पेपरच्या गुणांबाबतचा फॉर्म्युला अखेर निश्‍चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या अन्य

पुणे: करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे रद्द करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या भूगोल विषयाच्या पेपरच्या गुणांबाबतचा फॉर्म्युला अखेर निश्‍चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी काढून भूगोलाच्या पेपरचे गुण देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्यात ३ ते २३ मार्च या दरम्यान इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मार्च महिन्यात राज्यातील बहुसंख्य ठिकाणी करोनाचा प्रसार वाढत चालल्याचे आढळून आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून २३ मार्च रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या भूगोल विषयाच्या पेपरची लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला होता. याबरोबरच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाची परीक्षाही रद्द करण्यात आली होती.या रद्द झालेल्या विषयांचे गुणदान कसे होणार याबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबत शासन कधी निर्णय घेणार असा प्रश्‍न राज्य मंडळाना सतत विचारण्यात येत होता. त्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे. राज्य मंडळाच्या सक्षम तज्ज्ञ समितीने रद्द झालेल्या विषयांच्या पेपरचे गुणदान करण्याबाबत विविध पर्यायांचा अभ्यास करुन नियमाप्रमाणे प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव राज्य मंडळाकडून शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास शासनाकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे.

भूगोल या विषयासाठी ४० गुणांची परीक्षा घेण्यात येणार होती. ती रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना अन्य विषयांच्या परीक्षेस मिळणाऱ्या गुणांची सरासरी विचारात घेऊन त्याचे रुपांतर करुन गुण देण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयांचे गुणदान त्याने अन्य विषयांच्या लेखी, तोंडी किंवा प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी करुन देण्यात येणार आहेत. शासनाच्या निर्णयाप्रमाणे दोन्ही विषयांच्या परीक्षेसाठी गुणदान करुन निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे व सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिली आहे.