आघाडीने आरक्षणाचा खेळखंडोबा केला; चंद्रकांत पाटील यांचा घणाघाती आरोप

भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आणि ते न्यायालयात भक्कमरित्या टिकवले असे सांगत या लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केले ते सांगावे, अशा शब्दात त्यांनी टीका केली. आरक्षणाच्या मुद्दा सुप्रीम कोर्टात विचारार्थ असतानाच पाटील यांनी या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले.

    पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण तप्त झाले असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला, असा आरोप त्यांनी केला.

    भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आणि ते न्यायालयात भक्कमरित्या टिकवले असे सांगत या लबाड सरकारने मराठा समाजासाठी काय केले ते सांगावे, अशा शब्दात त्यांनी टीका केली. आरक्षणाच्या मुद्दा सुप्रीम कोर्टात विचारार्थ असतानाच पाटील यांनी या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले.

    ‘मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केले. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी काँग्रेस-राष्ट्रवादीने आजपर्यंत घेतली. मराठा समाजासाठी करण्यासारखे खूप काही आहे, पण हे अकार्यक्षम सरकार मुद्दाम मराठा समाजाची हेळसांड करत असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

    आम्ही मराठा समाजाला दिलेले आरक्षण 102 व्या घटना दुरुस्तीच्या पूर्वीचे आहे. आम्ही हे ठामपणे उच्च न्यायालयात मांडले आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पण या सरकारने सुप्रीम कोर्टात विषयाला फाटे फोडून मराठा आरक्षणात गोंधळ निर्माण केला. ठाकरे सरकारने संवेदनशीलता दाखवत आरक्षणासाठी योग्य पावले उचलावी व आरक्षण मिळेपर्यंत इतर उपलब्ध पर्याय लागू करावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.