A lot of funds are needed to carry out development works in the constituency, informed Abdul Sattar

पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले.

    पुणे : महापालिका निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्यात आलेल्या २३ गावांबाबत राज्य सरकारने आज एक महत्वाचा निर्णय घेतलाय,अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंबई येथे दिली. पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्यात आलेल्या २३ गावातील शाळा, जमिनी, अंगणवाड्या या सर्व जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागांना मंजुरी दिल्याची माहिती सत्तार यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला पुण्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महापौरांनीही या बैठकीला उपस्थित राहायला हवं होतं. त्यांना व्यक्तिगत निमंत्रण देण्यात आलं होतं की नाही याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं सत्तार म्हणाले. नगरविकास, महसूल, ग्रामविकास या सर्व विभागांना एकत्र आणून या गावांबाबत निर्णय घेण्यात आला. महापालिका कशी सक्षम होईल त्या दृष्टीकोनातून ही बैठक होती. ही कुठलीही राजकीय बैठक नव्हती, तर शासकीय बैठक होती. पुणे महापालिकेच्या हद्दवाढीतील सर्व शाळा, पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी यांचा महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

    – अजित पवारांचे प्रशासनाला निर्देश
    पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.

    – हद्दवाढीतील गावांबाबत कोणते महत्वाचे निर्णय?
    पुणे महापालिका हद्दीतील म्हाडाच्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या, तसंच हद्दीत समाविष्ट गावांमधील शाळा, अंगणवाड्या पुणे महापालिकेला हस्तांतरीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे पाणीयोजनांचे हस्तांतर तसेच पुणे महानगरपालिका विकास आराखड्यातील बालग्राम प्रमाणेच अग्रसेन शाळेची जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत केली. पुणे शहराच्या जलद व सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकार कट्टीबध्द असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी बैठकीत केला.