नुकसानग्रस्त शेतकऱ्याना शासनाने तात्काळ मदत करावी

शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी
भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरील बटाटा पिकाच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात येऊन भरीव आर्थिक मदत करावी, यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कृषी मंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
सातगाव पठार भागात हजारो हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात एकमेव बटाटा पीक घेतले जाते. बटाटा लागवड क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे काढणीस आलेला बटाटा शेतातच सडू लागला आहे. तर काही शेतकऱ्यांनी बटाटा ओढा, नाल्यात फेकून दिला आहे, याचीही पहाणी आढळराव पाटील यांनी केली. सातगाव पठारावरील पेठ, पारगावतर्फे खेड, कारेगाव, थुगाव, भावडी, कुरवंडी, कोल्हारवाडी व खेड तालुक्यातील, गुळाणी, वाफगाव, वाकळवाडी आदी भागातील सुमारे ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांचे सुमारे ४०० कोटी रुपयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसराची (दि.२१) रोजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हा प्रमुख सुनिल बाणखेले, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले, राम तोडकर, बाळासाहेब काळे, अशोक बाजारे यांच्या समवेत शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेतल्या.

जिल्हाधिकारी पुणे, कृषी आयुक्तांना पत्रव्यवहार करून तत्काळ पंचनामे करण्यासह योग्य मदतीसाठी झालेल्या नुकसानीचा अहवाल राज्य शासनास सादर करण्याचा सूचना केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादाजी भुसे यांनाही पत्रव्यवहार केला असून राज्य शासनाने या नुकसानीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्याची मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.