हाताशी आलेले मुगीचे पीक लहरी हवामानाने हिरावले

– येवतीच्या जालिंदर दिवटे या शेतकऱ्याची व्यथा 

कवठे येमाई : कोरोना महामारीच्या काळातही जीवापाड मेहनत घेत जेमतेम असणाऱ्या शेतीत पावसावर आधारित पिके घेणाऱ्या अनेक शेतकऱयांना सध्याच्या लहरी हवामानाचा मोठाच फटका बसलाय.त्याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील येवती गावचे शेतकरी जालिंदर दिवटे यांचे होय. आपल्या वडिलोपार्जित शेतीत त्यांनी अडीच एकरात  पावसावर आधारित मुगीचे पीक घेतले. मुगीचे पीक शेंगा येण्याच्या कालावधीतच लहरी हवामानाच्या फटाक्याने सुमारे ३५ हजार रुपये खर्च करून घेतलेले हे पीक केवळ उन्हा अभावी पिवळे पडले व पिकास आलेला फुलोराच नष्ट झाल्याने या शेतकऱ्यावर हे पीक ट्रॅक्टर लावून रोटरण्याची वेळ यावी या सारखी शोकांतिका नाही. परिसरातील मुगीचे पीक घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांना ही या बेभरवासी हवामानाचा दणका बसला आहे.        

श्रीगोंदा तालुक्यातील येवती गावातील शेतकरी जालिंदर दिवटे यांनी व्यक्त केलेली ही व्यथा नक्कीच हृदयस्पर्शी आहे. चालू वर्षी पाऊस म्हणावा तसा नाही परंतु मुगीचे पीक निघेल असा पाऊस सुरवातीस पडला.त्याच आधारावर दिवटे यांच्यसह परिसरातील अनेक शेतकरी बांधवानी अपेक्षेप्रमाणे मुगीची पेरणी वेळेत करून घेतली. योगायोगाने गरजेनुसार पाऊसही होत राहिला.  परंतु निसर्गाला मान्य नव्हते म्हणून काही दिवस ऊन पडलेच नाही. परिणामी चांगला असलेले मूगीचे पीक  मात्र ऊन नसल्याने पिवळी पडले. आणि मुगीला शेंगा आल्याच नाहीत.काळजावर दगड ठेवून हाताशी आलेले पण लहरी हवामानामुळे वाया गेलेले मुगीचे पीक दिवटे यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटरुन काढावे लागले.          

याच संदर्भात सर्वसामावेशक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या वतीनं दिवटे यांनी सरकारला विनंती केलीय कि, शेतकऱ्यांना पोकळ आश्वासने देऊ नका, कारण सध्यस्थितीत शेतकऱ्यांचे जीवनच त्यांचे एक आश्वासनच होऊन राहिलेले आहे.संकट काळात शेतकऱयांना जर सरकार खरोखरच मदत देणार असेल तरच द्या. अन्यथा त्याला आशेला लावू नका असे कळकळीचे आवाहन ही दिवटे यांनी केले आहे.  

 एकीकडे करोनाचे संकट,उत्पादित शेतीमाल व शेती जोडधंद्यास मिळणारे पडेल भाव याही संकटात बळीराजा कर्ज काढून,तग धरून शेती उत्पादित करण्याचा जीवापाड प्रयत्न करीत आहे.असे असताना  अवेळी होणारा पाऊस, ढगाळ वातावरण, दुधाचे कमी होणारे दर तर दुसरीकडे सरकारची नुसती आश्वासने, कर्ज माफीपासून अजूनही अनेक शेतकरी वंचित, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा एका वर्षाहून अधिक कालावधीपासून काही शेतकऱ्यांना हप्ता मिळतोय तर काहींना मिळलाच नाही तर  तो नुसता कागदावरच दिसत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या असता आज महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त अंधारच उभा आहे. या संकट काळात तरी सरकारने शेतकऱ्यांना ठोस व भक्कम दिलासा देण्याची गरज जालिंदर दिवटे यांनी व्यक्त केली आहे.