कचरा प्रश्नामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राजगुरुनगर :  राजगुरुनगर (ता. खेड) येथे स्थानिक नगरपरिषेदेने साठवणूक करून ठेवलेला कचरा रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. दुर्गंधीमुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तसेच कोरोनाकाळात आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. पोलिस ठाण्यामागील रस्ता घाणीच्या विळख्यात अडकला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
भीमानदीकाठी खेड पोलिस ठाण्याच्या पाठीमागे राजगुरुनगर शहरातील कचरा उचलून घंटागाडी द्वारे येथे आणण्यात येतो. मात्र येथे अगोदरच कचऱ्याचे ढिगारे पडले असल्यामुळे हा कचरा रस्त्यावरच टाकला जातो. त्यामुळे राजगुरुनगर शहरात पोलीस ठाण्याच्या पाठीमागील रस्त्यावरून ये – जा करताना नागरिकांना नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याठिकाणी मोकाट कुत्री व डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी याठिकाणी सुटली आहे. या कचरा डेपो शेजारीच खेड पोलीस ठाण्याची चौकी आहे याठिकाणी अनेक नागरिक कामानिमित्त रोज येत असतात .त्यामुळे येणाऱ्या नागरिकांचे व पोलिसांचे या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण राजगुरुनगर शहरात आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने या कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र याकडे सर्वांनीच पाठ फिरवली असल्‍याचे चित्र दिसत आहे. या दुर्गंधीमुळे याठिकाणी मच्छर व डासांना पोषक वातावरण निर्माण झाले आहेत त्यामुळे डेंगू व इतर रुग्णही शहरात आढळून येत आहे.
या दुर्गंधीमुळे पावसळ्यामध्ये होणाऱ्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत नगर परिषद प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.