विमान दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना डॉ. धनंजय दातार २० लाखांचा निधी देणार

पुणे : एअर इंडियाचे दुबईहून आलेले विमान केरळमधील कोझिकोड विमानतळावर घसरुन अलिकडेच झालेल्या दुर्घटनेत वैमानिक, सह-वैमानिक व प्रवाशांसह १८ जण मृत्यूमुखी पडले. या मृतांच्या वारसांना वैयक्तिक साह्य म्हणून अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार त्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत २० लाख रुपयांचा निधी देणार आहेत.
यासंदर्भात बोलताना डॉ. दातार म्हणाले, “या विमानाचे सारथ्य भारतीय हवाई दलातून निवृत्ती घेऊन एअर इंडियात आलेले, अत्यंत अनुभवी व निष्णात वैमानिक कॅप्टन दीपक वसंत साठे करत होते. ते भारतीय हवाईदलाचे उत्कृष्ट व गौरवपूर्ण कामगिरी बजावलेले अधिकारी होते. माझे दिवंगत वडील महादेव दातार हेसुद्धा भारतीय हवाईदलाचे माजी अधिकारी होते त्यामुळे मला या दलाविषयी प्रबळ आत्मीयता आहे. मी या विमान अपघाताची बातमी ऐकली तत्क्षणी त्यातील मृतांसाठी स्वतःहून काही मदत करण्याची उर्मी मनात दाटून आली.”

-म्हणून मी वैयक्तिकरीत्या हा पुढाकार घेतला
दातार पुढे म्हणाले, “या दुर्दैवी विमान फेरीतील अनेक प्रवासी असे होते ज्यांनी परदेशातील त्यांचे रोजगार गमावले होते. अनेकजण व्हिजिट व्हिसाची मुदत संपल्यामुळे मायदेशी परत येत होते. अनेकांपुढे आर्थिक विवंचना होत्या. अशा स्थितीत मृत प्रवाशांवर अवलंबून असणाऱ्या कुटूंबियांवरील किमान आर्थिक दडपण काहीसे हलके व्हावे म्हणून मी वैयक्तिकरीत्या हा पुढाकार घेतला आहे. गेलेला जीव परत येणार नाही याचे दुःख आहेच, पण या अर्थसाह्यामुळे किमान मृतांच्या कुटूंबाना अडचणींवर मात करण्यात मदत तरी होईल. मी एअर इंडियाच्या आपत्ती व्यवस्थापन संघाशी थेट समन्वय साधून ही मदत अखंड स्वरुपात योग्य व गरजू लोकांच्या हाती पडेल यासाठी प्रयत्न करत आहे. मला नेहमीप्रमाणेच भारतीय कॉन्सुलेटचा या मोहिमेसाठीही पाठिंबा मिळत आहे.”