विजयाची ‘आस’ पूर्णत्वास , काॅग्रेसला निर्विवाद यश ; पराभवाची मालिका अखेर खंडीत

संदीप पाटील , पुणे : विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघात नव्या चेहऱ्याला निवडून देण्याची परंपरा कायम राहीली. महाविकास आघाडीची ताकद एकवल्याने काॅग्रेसची पराभवाची मालिका खंडीत झाली. प्रा. जयंत आसगावकर यांच्या रुपाने काॅग्रेसला शिक्षक मतदार संघात पहिल्यांदाच निर्विवाद यश मिळाले. विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी एकाकी झूंज दिली. मात्र महाविकास आघाडीच्या बलाढ्य ताकदीपुढे त्यांची ताकद अपुरी पडली.

संदीप पाटील , पुणे : विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघात नव्या चेहऱ्याला निवडून देण्याची परंपरा कायम राहीली. महाविकास आघाडीची ताकद एकवल्याने काॅग्रेसची पराभवाची मालिका खंडीत झाली. प्रा. जयंत आसगावकर यांच्या रुपाने काॅग्रेसला शिक्षक मतदार संघात पहिल्यांदाच निर्विवाद यश मिळाले. विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी एकाकी झूंज दिली. मात्र महाविकास आघाडीच्या बलाढ्य ताकदीपुढे त्यांची ताकद अपुरी पडली.

विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघात सुरेश पाटील यांचा अपवाद वगळता विद्यमान आमदाराला पुन्हा विजय संपादन करता आला नाही. प्रत्येक निवडणुकीत नवी समीकरणे आकाराला आली. गतवेळच्या निवडणुकीत शिक्षक परिषदेचे तत्कालीन आमदार भगवानराव साळुंखे यांना पराभवाचा सामना करावा लागला. विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी कृती समितीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवित साळुंखे यांच्यावर मात केली होती. या निवडणुकीत काॅग्रेसचे अधिकृत उमेदवार डाॅ. मोहन राजमाने दुसऱ्या क्रमांकावर राहीले. काॅग्रेस विचारांच्या मतांचे विभाजन झाल्याने सावंत यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली.

-महाआघाडीची ताकद एकवटली
आताची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढविल्याने पुण्याची जागा काॅग्रेसच्या खात्यात जमा झाली. काॅग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ मिळाल्याने पदवीधर व शिक्षकमध्ये आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली. आघाडीच्या उमेदवारीसाठी अनेकांनी वरिष्ठांना साकडे घातले होते. विद्यमान आमदार सावंत यांचाही यात समावेश होता. मात्र आघाडीच्या जागा वाटपात शिक्षकची जागा काॅग्रेसकडे असल्याने सावंत उमेदवारीच्या शर्यतीतून बाहेर पडले. करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे निकटवर्तीय प्रा. जयंत आसगावकर यांना अखेरच्या क्षणी काॅग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

-आसगावकरांना दिग्गजांचे पाठबळ
दत्तात्रय सावंत कृती समितीच्या माध्यमातून पुन्हा रिंगणात उतरले. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर कृती समितीमध्ये फूट पडली. निवडणुकीच्या नमनालाच सावंत यांना विरोधाला तोंड द्यावे लागले. याउलट आसगावकर यांना काॅग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांची भक्कम पाठबळ मिळाले. आसगावकर कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह आघाडीच्या नेत्यांनी आसगावकर यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग नोंदविला.

-भाजप पुरस्कृत उमेदवाराची िपछाडी
दक्षिण महाराष्ट्रातील मोठ्या शिक्षण संस्थांवर काॅग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वर्चस्व असल्याने सुरुवातीपासून आसगावकर यांचे पारडे जड राहीले. पुण्यात सर्वाधिक मतदार असताना कोल्हापूर, साताऱ्यातून झाडून मतदान झाले. त्याचा आसगावकर यांना चांगला फायदा झाला. भाजपच्या नेत्यांनी जितेंद्र पवार यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. भाजपच्या नेत्यांनी पदवीधरच्या लढतीवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. त्यातून भाजपने शिक्षकची निवडणूक सोडून दिल्याचे चित्र उभे राहीले. परिणामी जितेंद्र पवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

-निवडणुकीवर पक्षीय प्रभाव अधिक

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व महाराष्ट्र शिक्षक परिषद या दोन संघटनांशी राज्यातील शिक्षकांची मोठी फळी जोडली गेली आहे. मात्र दोन्ही संघटनांच्या उमेदवारांना फार मजल मारता आली नाही. संघटनांपेक्षा पक्षीय प्रभाव अधिक दिसून आला. यापूर्वी राजकीय पक्ष संघटनांच्या उमेदवारांना पुरस्कृत करायचे. परंतु अलिकडे पक्षाचाच अधिकृत उमेदवार दिला आहे. या सुरुवातीला जुनी पेन्शन योजना, टप्पा अनुदान, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन या मुद्यांवर उमेदवारांचा फोकस होता. मात्र प्रचाराच्या रणधुमाळीत हे मुद्दे कधी बाजूला पडले, हे कोणालाच कळले नाही.

 -निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये

नव्या चेहऱ्याला पुन्हा पसंती
दत्तात्रय सावंतांची एकाकी झूंज
शिक्षक संघटनांचा प्रभाव ओसरला
भाजप पुरस्कृत उमेदवार पराभूत
प्रचाराच्या रणधुमाळीत मुद्दे दुर्लक्षित
वरिष्ठ सभागृहात काॅग्रेसची जागा वाढली
काॅग्रेस-राष्ट्रवादीचा एकदिलाने प्रचार
नेत्यांनीच हातात घेतली प्रचाराची सूत्रे
एकगठ्ठा मते आसगावकरांच्या पारड्यात