‘मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात…

कोरोनामुळे कोणत्याही प्रकारची गर्दी न करता अत्यंत साधेपणाने विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला जात आहे. यासाठी मंडपामध्येच बाप्पाचे विसर्जन करण्यात येत आहे. 

    पुणे: ”गणपती बाप्पा मोरया,अन् पुढच्या वर्षी लवकर या”, च्या जयघोषात पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. फुलांची उधळण व ‘मंगलमूर्ती मोरया’ च्या जल्लोषात मानाचा पहिला श्री कसबा गणपतीचे(Kasba Ganapati) सकाळी ११.३० वाजता विसर्जन झाले. मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला शहराचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पहार अर्पण केला. परंपरेप्रमाणे श्रींची मूर्ती पालखीतून मांडवाजवळील कृत्रिम हौदापाशी आणल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष श्रीकांत शेटे आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते बाप्पाला निरोप देण्यात आला.

    याबरोबरच मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या(Shri Tambadi Jogeshwari Public Ganeshotsav)श्रींच्या मूर्तीला महापौरांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर सकाळी ११.३५ वाजता मूर्तीचे मांडवाजवळ कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. तसेच मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पालाचे गुलालाची उधळण करून मांडवाजवळील कृत्रिम हौदात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

    मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव ( Shri Tulshibagh Public Ganeshotsav) मंडळाच्या श्रींच्या मूर्तीचेही महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण कल्यानंतर , श्री तुळशीबाग मंडळाने आकर्षक गजकुंड केलेले असून त्यावर फुलांची सजावट असणार आहे. पारंपरिक धार्मिक पद्धतीने उत्सव मंडपात गणरायाचे विसर्जन मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांच्या हस्ते होणार आहे. मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या(Kesariwada Ganeshotsav Mandal) श्रींची मूर्ती परंपरेनुसार पालखीतून मांडवात आणली जाईल. महापौर दुपारी दोन वाजता गणपतीच्या मूर्तीला आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर मांडवातील कृत्रिम हौदात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल.

    भारतातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मूर्तीला महापौर दुपारी पाउणे तीन वाजता पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर मांडवाजवळीला कृत्रिम हौदात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट‌ आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने श्रींच्या मूर्तीचे विसर्जन आणि उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात होणार आहे. सूर्यास्ताच्यावेळी सायंकाळी सहा वाजून ३६ मिनिटांनी मंदिरामध्ये मूर्तीचे विसर्जन होणार आहे. हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. ट्रस्टने केलेल्या ऑनलाइन दर्शन सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे कौतुक केले आहे. भक्तांना या संकेतस्थळावर www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live पाहता येणार आहे.

    अखिल मंडई मंडळाच्या‌ शारदा गजाननाचे विसर्जन सायंकाळी साडेसहा वाजता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. विसर्जनासाठी मंडळाने मांडवाजवळ गजगवाक्ष अमृत कलशाची प्रतिकृती उभारली आहे. कोरोनामुळे कोणत्याही प्रकारची गर्दी न करता अत्यंत साधेपणाने विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला जात आहे. यासाठी मंडपामध्येच बाप्पाचे विसर्जन करण्यात येत आहे.