मानाच्या गणपतींचे विसर्जन यंदा उत्सव मंडपातच

पुणे :   कोरोना विषाणू (Corona Virus)संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या आणि इतर प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार यावर्षी मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांनी प्राणप्रतिष्ठापना, धार्मिक कार्यक्रम साधेपणाने केले आहेत. आता गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन देखील सांगता मिरवणूक न होता उत्सव मंडपातच केले जाणार आहे. अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली.
मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, मानाचा तिसरा श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, मानाचा चौथा श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, पुनीत बालन यांच्यासह नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी या प्रसंगी उपस्थिती होती.