टाळेबंदीच्या काळाने दाखवले पर्यावरणाचे महत्त्व:  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

पुणे : पक्षांचा किलबिलाट, निळे आकश, जलाशयात वाढणारी जैवविविधता, हवेतील शुद्धता या गोष्टीची नव्याने ओळख आपल्याला टाळेबंदीच्या काळात झाली. हा काळ शांत राहून धैर्याने पुढे जाण्याचा असल्याने हे पर्यावरण

पुणे : पक्षांचा किलबिलाट, निळे आकश, जलाशयात वाढणारी जैवविविधता, हवेतील शुद्धता या गोष्टीची नव्याने ओळख आपल्याला टाळेबंदीच्या काळात झाली. हा काळ शांत राहून धैर्याने पुढे जाण्याचा असल्याने हे पर्यावरण शाश्वत कसे राहील, शुद्धता टिकवता कशी येईल याचा विचार व कृती होणे ही काळाची गरज असल्याचे जाणवले आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी पर्यावरणाला पूजायला हवे. यासाठी सरकारने १०० कोटींचा निधीही मान्य केला आहे व त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही सुरु केले आहेत,असे मत राज्य पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या वतीने एका राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. अनिता सणस यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी फ्लोच्या राष्ट्रीय अध्यक्ष जानबी पूखन प्रमुख अतिथी होत्या. फिक्की फ्लोच्या पुणे चॅप्टरच्या माजी अध्यक्षा वर्षा चोरडिया, सदस्या भाग्यश्री पाटील तसेच राज्यातील विविध भागातील फ्लो सदस्य यावेळी सहभागी झाले होते.

या वेबिनारमध्ये कोविड-१९ व शाश्वत पर्यावरण या विषयावर भर देत ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, कोविड-१९ हे महाराष्ट्रासाठी आव्हान आहे. कोणीही यापूर्वी कधी न अनुभवलेली ही स्थिती आहे. महाराष्ट्र, मुंबई याची तुलना अन्य कशाशीही होऊ शकत नाही. इथे भाषेचा लहेजा, पाण्याची चव, लोकांचे राहणीमान, जीवनशैली या सगळ्यातच टप्प्याटप्प्यावर विविधता बघायला मिळते. कमी जागेत जास्त लोक राहणाऱ्यांची, सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशात ‘सोशल डीस्टेन्स’ पाळणे कितपत यशस्वी होऊ शकते यावर काम करणे हे आव्हान आहे. मात्र राज्य सरकार त्यावर सर्वतोपरी काम करत आहे. यात आम्हाला अनेक कॉर्पोरेट संस्थांनी, मोठमोठ्या हॉटेल्सनी मदत केली आहे.

कोविड-१९ नंतरही हे पर्यावरण व पर्यटन शाश्वत राहावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण पर्यटन हा मोठा उद्योग होऊ शकतो. ज्यातून अनेकांना रोजगार मिळणार आहे. पर्यटन फॅन्सी भपकेबाजी करण्यापेक्षा शाश्वत सौंदर्य टिकवत आपल्या मुळाची ओळख पटवून देणे या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रातील दुर्ग, गड, किल्ले, थंड हवेची ठिकाणे, समुद्र, पठारे, संस्कृती अशा सगळ्याच प्रकारचे सौंदर्य येथे असल्याने ते पर्यावरणपूरकरित्या जपत तेथे पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू,असेही त्यांनी यावेळी सांगितले.