राज्यात सहकारी साखर कारखान्याच्या शेअर्समध्ये वाढ हे तर सहकारातील “तौक्ते “वादळ ; पृथ्वीराज जाचक यांची टीका

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ खाली प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन शासन शेअर्स रक्कम वाढविण्याबाबत निर्देश दिले आहेत.राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या भागाची दर्शनी किंमत रु.१० हजार वरुन १५ हजार रुपये करावी.यासाठी सर्व सहकारी साखर कारखान्यांनी उपविधिमध्ये दुरुस्ती करावी,असे आदेश देण्यात आले आहेत.

  बारामती : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या ‘शेअर्स’ रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार शेअर्स ची रक्कम १०  हजारांवरून १५ हजार करण्यात आली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा अडचणीचा असून हा निर्णय म्हणजे सहकारातील “तौक्ते “वादळ असल्याची टीका राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केली आहे.

  केंद्र शासनाने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती क्षमतेमध्ये आणि पुरवठयामध्ये वाढ करण्यासाठी वेगवेगळया उपाययोजना राबविलेल्या आहेत. तसेच केंद्र शासनाचे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण ५ टक्क्यांवरून २० टक्के पर्यंत वाढविण्याचे धोरण आहे. केंद्र शासनाने इथेनॉल निर्मिती करण्यासाठी राज्यातील १२६ साखर कारखान्यांच्या आसवणी प्रकल्पांना व्याज अनुदान देण्यास मंजुरी दिलेली आहे. तसेच सदर साखर कारखान्यांपैकी ६७ सहकारी साखर कारखाने आहेत.
  त्या सहकारी साखर कारखान्यांना विस्तारवाढ करण्यासाठी आणि उपपदार्थावरील प्रकिया करणा-या प्रकल्पांच्या उभारणीसाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे आवश्यक झालेले आहे. ज्याअर्थी सहकारी साखर कारखान्यांची वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारण्याची क्षमता क्षीण झालेली आहे. काही सहकारी साखर कारखान्यांचे नक्तमूल्य व एन. डी. आर. उणे असल्यामुळे वित्तीय संस्थाकडुन कर्ज प्राप्त होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. केंद्र शासनाच्या इथेनॉल निर्मिती धोरणाप्रमाणे अमलबजावणी करण्यासाठी नवीन स्कार आसवणी प्रकल्प, कार्यरत आसवणी प्रकल्पामध्ये क्षमतावाढ, शून्य प्रदूषण पातळी राखण्यासाठी इन्सीनेशन बॉयलर उभारणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सहकारी साखर कारखान्यांना स्वनिधीची गुंतवणूक कमी पडत आहे. सहकारी साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी भागभांडवलामध्ये वाढ करणे आवश्यक आहे. भागभांडवलागध्ये वाढ झाल्याने स्वनिधीमध्ये वाढ होवुन नवीन प्रकल्प उभारताना कार्यरत प्रकल्पामध्ये क्षमता वाढ करताना, गाळप क्षमता वाढ करताना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे शक्य होणार आहे.

  त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ खाली प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन शासन शेअर्स रक्कम वाढविण्याबाबत निर्देश दिले आहेत.राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या भागाची दर्शनी किंमत रु.१० हजार वरुन १५ हजार रुपये करावी.यासाठी सर्व सहकारी साखर कारखान्यांनी उपविधिमध्ये दुरुस्ती करावी,असे आदेश देण्यात आले आहेत.

  अगोदरच शेतकऱ्यांचे सहकारी कारखान्यांकडे कोट्यवधी भागभांडवल जमा आहे. आता या निर्णयाने शेतकऱ्यांच्या हाती काय उरणार हा प्रश्न आहे.हा निर्णय सर्वस्वी अन्यायकारक आहे. कोणालाही विचारात न घेतलेल्या या निर्णयाला शेतकरी कृती समितीचा विरोध असेल. सहकार वाचविण्यासाठी या निर्णयाचा फेरविचार व्हावा.

  -पृथ्वीराज जाचक , माजी अध्यक्ष राज्य साखर कारखाना.