प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : प्राथमिक शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांच्या थकीत वेतनाचा व निवृत्ती वेतनाचा प्रश्न सुटला आहे. राज्यातील ‘अ’ वर्ग व ‘ब’ वर्ग नगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांचे दरमहा वेतन व निवृत्ती वेतन यासाठी शासन अनुक्रमे ८० टक्के व ९० टक्के अनुदान देते. उर्वरित २० टक्के व १० टक्के सहाय्यक अनुदान नगरपालिकांना त्यांच्या उत्पन्नातून द्यावे लागते. गेले वर्षभर राज्यातील बऱ्याच नगरपालिकांनी सहाय्यक अनुदान वेळेवर जमा केले नाही. तसेच वेतनासाठी आलेल्या अनुदानाचा विनियोग अन्य बाबींवर केला. त्यामुळे काही ठिकाणी प्राथमिक शिक्षकांचे वेतन सहा महिन्यांसाठी थकले.

    सदरची अनियमितता गंभीर स्वरूपाची असल्याने या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे व सरचिटणीस केशवराव जाधव यांनी दिनांक ७ जुलै २०२१ रोजी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचनालय वरळी मुंबई यांना निवेदन देऊन सहाय्यक अनुदान जमा करण्याबाबत नगरपालिका प्रशासनास आदेश व्हावेत, अशी मागणी केली.याकामी सोलापूर जिल्हा न. पा.म. न.पा.प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष गुरुसिद्ध कोरे यांनी पाठपुरावा केला.

    महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या विनंतीनुसार दिनांक ३ सप्टेंबर २०२१ रोजी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचनालय वरळी मुंबई यांनी “अ” व “ब” वर्ग नगरपालिकांनी सहाय्यक अनुदान रक्कम मुन्सीपल कौन्सिल प्रायमरी स्कूल फंड यांच्याकडे धनादेशाद्वारे त्वरित जमा करण्याचे आदेश निर्गमित केले. त्यामुळे नगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यरत प्राथमिक शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांच्या वेतनाचा व निवृत्ती वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

    भविष्यात नगरपालिका प्राथमिक शिक्षकांचे पगार १०० टक्के शासन अनुदानातून व्हावेत, याकरीता शिक्षक संघ पाठपुरावा करीत असल्याची माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली.