आघाडीचे नेते एकमेकांना फेविकॉल घेऊन चिकटलेत; चंद्रकांत पाटील यांची टीका

हसन मुश्रीफ यांनी केलेला घोटाळा सोमय्या यांनी उघडकीस आणला आहे. म्हणून मुश्रीफ त्यांच्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.

  पुणे : केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय हा शरद पवार यांनी केलेला आरोप आता जुना झाला आहे. आता नवीन आरोप करावा, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. तसेच किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार अस्थिर व्हावी म्हणून असे आरोप करत आहे, असे हसन मुश्रीफ यांना वाटतेय. पण आघाडीचे नेते एकमेकांना फेविकॉल घेऊन चिकटले आहेत, असेही पाटील म्हणाले.
  पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. ‘किरीट सोमय्या यांना पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ते चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. आता पुढचे टार्गेट कोण हे त्यांनाच विचारा. आमच्याकडे प्रत्येकाला ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्यात इतर नेते हस्तक्षेप करत नाहीत. ते स्वतः चार्टड अकाउंट आहेत त्यांना आर्थिक गोष्टींतील तपशील कळतात. त्यांनी ज्या-ज्या घोटाळ्यांचा पाठपुरावा केलाय त्याची कागदपत्रे पत्रकारांना दिली आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
  आघाडीचे नेते एकमेकांना फेविकॉल घेऊन चिकटलेत
  हसन मुश्रीफ यांनी केलेला घोटाळा सोमय्या यांनी उघडकीस आणला आहे. म्हणून मुश्रीफ त्यांच्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. त्यांनी खुशाल दावा दाखल करावा पण दावा दाखल करताना जी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते तो पैसा व्हाईट असावा. सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार अस्थिर व्हावी म्हणून असे आरोप करत आहे असे मुश्रीफ यांना वाटतेय. पण आघाडीचे नेते एकमेकांना फेविकॉल घेऊन चिकटले आहेत. मग सरकार कसं अस्थिर होईल?”असे पाटील म्हणाले.
  “नारायण राणे यांच्यावर सोमय्या यांनी आरोप केले होते. आता ते काहीही बोलत नाहीत. केंद्रात राणे यांना मंत्रिपद दिले आहे. या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले,”राणे चौकशी का थांबली हे संबंधित यंत्रणाना विचारा. मी सांगू शकत नाही.”
  “माझ्या काळातील कामांबद्दल मुश्रीफ यांनी आरोप केला आहे. सरकार येऊन 19 महिने झाले मग आताच हा आरोप का?आतापर्यंत काय झोपा काढल्या काय? ते माझे मित्र आहेत आणि माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. जर मी त्यांच्यासाठी झोपेची गोळी असेल तर ठीक आहे, असा टोला त्यांनी मुश्रीफ यांना लगावला.