धक्कादायक! प्रेयसीच्या मदतीने आईला मुलानेच संपवले ; लोणीकंद येथील घटना

मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास माने वस्तीमध्ये एका महिलेचा खून झाला अशी माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सुशीला वंजारी या मृत अवस्थेत आढळल्या.

    मुलाने आपल्या प्रेमप्रकरणात आईचा अडथळा निर्माण होत असल्याने प्रेयसीसोबत संगनमत करून आईचा खून केल्याची गंभीर घटना वढु खुर्द (ता. हवेली) येथे घडली आहे. सुशिला राम वंजारी (वय ३८, रा. मानेवस्ती वढु खुर्द (ता.हवेली) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. भर वस्तीत घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्याद देणारा मुलगा व प्रियसीला अटक करण्यात आली आहे. विशाल राम वांजारी (वय १९) असे आरोपी मुलाचे नाव तर नॅन्सी गॅबरियल डोंगरे (वय २६) असे त्याच्या प्रियसीचे नाव आहे. या खूनाची फिर्याद देणारा मुलगाच खुनी निघाल्याने परिसरात खळबळ पसरली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास माने वस्तीमध्ये एका महिलेचा खून झाला अशी माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सुशीला वंजारी या मृत अवस्थेत आढळल्या. यावेळी मुलगा विशाल वंजारी हा देखील तिथे होता. त्याने नांदेडच्या एका व्यक्तीने कर्जामुळे आईचा खून केला आणि फरार झाला असे पोलिसांना सांगितले. सुरूवातीला पोलिसांना त्याचं म्हणणं खरं वाटलं, त्यानुसार त्यांनी एफआयआर देखील दाखल केला. पण पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो खोटी माहिती देत असल्याचं आणि त्याच्या जबाबात तफावात असल्याचं पोलिसांना लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर विशालने प्रेयसीच्या मदतीने आईचा खून केल्याची कबुली दिली.
    विशालने पोलिसांना सांगितलं की, नॅन्सी आणि त्याचे प्रेमसंबंध होते, पण या नात्याला आई सुशीला वंजारी यांचा विरोध होता. घरातून पैसे चोरण्यावरुन त्याची आई त्याला अनेकदा ओरडायची. सोमवारी दुपारी घरातून १५ हजार ५०० रुपये चोरल्यावरुन दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि कडाक्याचे भांडण झाले. याचा राग मनात धरुन विशालने प्रेयसी नॅन्सी हिच्या मदतीने चाकूने वार करून आईचा खून केला. नंतर आईचा मृतदेह घराबाहेर आणून टाकला व खून झाल्याचा बनाव करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांचा डाव आणून पाडला आणि विशाल व नॅन्सी दोघांनाही अटक केली.