वाघोलीतील थकीत पथदिव्यांचे विजबिल महापालिका भरणार

  वाघोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पुणे महानगरपालिका हद्दीत १ जुलैपासून समाविष्ठ केलेल्या वाघोलीसह एकूण २३ गावांच्या थकीत पथदिव्यांचे विजबिल, तसेच कार्यालय, शाळा आदींची वीजबिले पुणे महानगरपालिका भरणार आहे. ही थकीत बिले भरण्यासाठी २०२०-२१ मधील दिवाबत्ती खर्चातील तरतूद वापरण्यात येणार आहे.

  महावितरणकडे नव्याने पुणे महानगरपालिकेत समाविष्ठ झालेल्या २३ गावांची मोठी रक्कमेची थकबाकी आहे. यामध्ये १ कोटी ८७ लाख सर्वाधिक थकबाकी वाघोली गावची आहे. ही थकबाकी जुनी असल्याने महावितरणने पथ दिव्यांचे कनेक्शन तोडले आहे.

  मोठी लोकसंख्या असलेल्या व अधिक वेगाने नागरीकरण झालेल्या दाट लोकवस्ती असलेल्या वाघोलीतील अनेक रस्ते अंधारमय झाल्याची दखल घेत याविषयी वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील व त्यांचे पती वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी आवाज उठविला असून, याबाबत पाठपुरावा केला होता. या सातव पाटील यांच्याच पाठपुराव्याची दखल आता पुणे महानगरपालिकेने घेतली असून, वाघोलीतील थकीत पथदिव्यांचे विजबिल महापालिका भरणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

  नव्याने महापालिकेत समाविष्ठ गावे अंधारमय होऊ नयेत म्हणून याची काळजी महापालिका घेत असून, यासाठी महापालिकेने मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

  वाघोली मोठे नागरिकरणाचे गाव असून, थकीत बिलांमुळे वाघोलीत रस्ते अंधारमय झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न ऐरणीवर आला होता. तसेच चोऱ्यांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. हा वाघोलीसह इतर समाविष्ठ गावांचा प्रश्न समजून घेत महापालिकेने थकीत वीजबिले भरण्याच्या योग्य निर्णय घेतला. याचे स्वागत आम्ही करीत आहे.

  – जयश्री सातव पाटील, माजी सरपंच, वाघोली