नगरसेवक किशोर भेगडे यांची मागणी तळेगाव दाभाडे: नगरपरिषदेने मिळकतकराची बिले १५ दिवसांत भरल्यास नागरिकांना सूट मिळावी, तसेच लाॅकडाऊन दरम्यान भाडेकरू सोडून गेलेल्या मिळकतधारकांनाही नगरपरिषदेकडून

नगरसेवक किशोर भेगडे यांची मागणी

तळेगाव दाभाडे: नगरपरिषदेने मिळकतकराची बिले १५ दिवसांत भरल्यास नागरिकांना सूट मिळावी, तसेच लाॅकडाऊन दरम्यान भाडेकरू सोडून गेलेल्या मिळकतधारकांनाही नगरपरिषदेकडून भाडेमूल्यावर कर सवलत द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांनी नगरपरिषदेकडे पत्रकार परिषदेत केली.

कोरोना महामारीच्या काळात तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील मिळकतदारांचे भाडेकरू भाड्याच्या खोल्या सोडून गेले आहेत. ज्या मिळकतदारांचे भाडेकरू खोल्या सोडून गेले आहेत त्यांनी ३० जूनपर्यंत तळेगाव दाभाडे परिषदेमध्ये सन २०२०-२१ मध्ये येणारा मिळकत कर कमी करावा, असा लेखी अर्ज करावा, असे आवाहन ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे व उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.

-अर्ज घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा

तळेगाव परिसरामध्ये राहणारे भाडेकरू गेली दोन महिने कोणत्याही प्रकारचा कामधंदा नसल्याने आपल्या गावी निघून गेले आहेत. त्यास अनुसरून त्यांनी भाड्याच्या खोल्या रिकाम्या करून गावाला प्रस्थान केले. परंतु तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने या खोल्यांमध्ये भाडेकरू आहेत म्हणून जास्त मिळकतकर लावला आहे. परंतु आत्ता त्याठिकाणी भाडेकरू नसल्याने तो मिळकतकर रद्द करावा व चटई क्षेत्राप्रमाणे कर आकारणी व्हावी, अशी मागणी भेगडे यांनी केली होती. त्यास नगरपरिषदेने दुजोरा दिला आहे. यासाठी  मिळकतदारांनी भाडेकरू नसल्याने मिळकत कर कमी करावा अशा मागणीचा अर्ज नगरपरिषदे मध्ये ३० जून पर्यंत भरून द्यावा. असे आवाहन भेगडे यांनी यावेळी केले.

यावेळी भेगडे म्हणाले की, तळेगाव दाभाडे नगर परिषदेने अर्ज घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा. तसेच ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची तरतूद करावी. या कोरोना तसेच कोरोना महामारीच्या काळामध्ये बरेचसे कामगार घरी होते. त्यामुळे त्यांचेवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.यासाठी त्यांना मिळकत भरण्यास उशीर लागेल.

या मिळकतकरावर आकारण्यात येणारे भाडेमूल्यावर करसवलत द्यावी. मिळकत कर भरल्यास लागणारे दोन टक्के व्याज माफ करावे अशी मागणी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी केली. यावेळी नगरसेविका मंगल भेगडे तळेगाव शहर राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा ज्योती शिंदे आदी उपस्थित होते.