समाविष्ट २३ गावांमधी थकीत वीजबीले पालिका भरणार ; स्थायी समितीची ४ कोटी २७ लाख खर्चास मंजुरी

जिल्हा परिषदेने पालिकेला २३ ग्रामपंचायतींच्या खात्यावर असलेल्या सर्व रकमा मिळणार आहेत. याशिवाय गायरान जमिनी, ऍमिनिटी स्पेस देखील उपलब्ध होणार आहे. तसेच नागरिकांकडून कर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालिकेवर या गावांच्या थकबाकी अदा करण्याची जबाबदारी राहील, अशी भूमिका घेतली होती.

    पुणे : नवीन समाविष्ठ २३ गावांमधील पथदिवे, पाणीपुरवठा आणि विविध शासकीय कार्यालयांची थकीत वीज बिलाची रक्कम महापािलका भरणार आहे. त्यासाठी स्थायी समितीने ४ कोटी २७ लाख २८ हजार ६१२ रुपये खर्च करण्यास‌मंजुरी दिली आहे.

    राज्य शासनाने नुकतेच महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्याचे आदेश काढले आहेत. समाविष्ट गावांमधील रस्त्यावरील पथदिवे (स्ट्रीट लाइट), पाणीपुरवठा तसेच गावांमध्ये असलेल्या शाळा, सरकारी कार्यालयांसाठी विजेचा वापर झाला आहेत. त्याचे वीजबिल अद्याप थकीत आहे. गावे पालिका हद्दीत आल्याने गावांची थकबाकी कोणी भरायची, यावरून पेच निर्माण झाला होता.

    यासंदर्भात जिल्हा परिषदेने पालिकेला २३ ग्रामपंचायतींच्या खात्यावर असलेल्या सर्व रकमा मिळणार आहेत. याशिवाय गायरान जमिनी, ऍमिनिटी स्पेस देखील उपलब्ध होणार आहे. तसेच नागरिकांकडून कर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालिकेवर या गावांच्या थकबाकी अदा करण्याची जबाबदारी राहील, अशी भूमिका घेतली होती.

    दरम्यान, गावांमधील पथदिवे, पाणीपुरवठा, शाळा, सरकारी कार्यालयांचे वीज मिटर पालिकेच्या नावे हस्तांतरीत करण्याची प्रक्रीया हाती घेतली आहे. ही सर्व मिटर हस्तांतरीत होण्यासाठी थकीत वीज बिले भरणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रशासनाने गावांमधील थकीत वीज बिले भरण्यासाठी निधी उपलब्ध करून तो खर्च करण्यास परवानगी मागणारा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे‌ समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.