‘त्या’ खूनाचा उलघडा ; आरोपीला अटक , ४८ तासात मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात यश

मंगल गुप्ता हा गेल्या २५ वर्षांपासून धायरी परिसरात राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो मिळेल ते काम करत असे. तसेच, मद्याच्या नशेत मिळेल त्या जागी झोपत असे. दरम्यान, गेल्या आठवड्यात (गुरुवारी) धायरी भागात रक्ताच्या थारोळ्यात एकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला होता. शवविच्छेदनात त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती.

  पुणे: सिंहगड परिसरातील  ‘त्या’ खूनाचा उलघडा करण्यात पोलिसांना  यश आले असून, कोणताही पुरावा नसताना सिंहगड रोड  पोलिसांनी ४८ तासात मृत व्यक्तीची   ओळख पटवत खून करणाऱ्या  हॉटेल कामगाराला अटक केली.   तत्कालीक कारणावरून खून केल्याचे समोर आले असल्याचे  वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे यांनी सांगितले.  शुभम भगवान पुयड (वय २५, रा. अंबाईदरा, धायरी, मुळ. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर,   मंगल प्रसादसिंग गुप्ता (रा. धायरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे.

  शवविच्छेदनात खून झाल्याचे स्पष्ट
  मंगल गुप्ता हा गेल्या २५ वर्षांपासून धायरी परिसरात राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो मिळेल ते काम करत असे. तसेच, मद्याच्या नशेत मिळेल त्या जागी झोपत असे. दरम्यान, गेल्या आठवड्यात (गुरुवारी) धायरी भागात रक्ताच्या थारोळ्यात एकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला होता. शवविच्छेदनात त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती.

  वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी प्रथम मृतदेहाची ओळख पटविण्याच्या सूचना केल्या होत्या.  त्यानुसार पथकातील उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ व पथकाने प्रथम धायरी परिसर पिंजून काढला. येथील नागरिकांकडे फोटो दाखवत त्याची ओळख पटवित असताना तो मंगल गुप्ता असल्याचे समोर आले. परंतु, त्याचा खून कोणी केला हे मात्र गुलदस्त्यातच होते.

  आरोपीकडून खुनाची कबुली
  पोलिसांनी  खबऱ्यांना कामास लावले. त्यावेळी एका तरुणाविषयी माहिती मिळाली. तसेच, तो या भागात संशयास्पदरित्या फिरत होता, असे समजले. त्यानुसार त्याची माहिती काढली असता तो एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचे समजले. संबंधित हॉटेलात चौकशी केली असता तो दोन दिवसांपासून कामावर आला नसल्याचे सांगण्यात आले. मग, पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने खूनाची कबूली देत त्याने आपले नाव शुभम पुयड असल्याचे  सांगितले.

   शाब्दिक चमकीच्या रागातून केला खून
  दोघांत शाब्दिक चकमक झाली होती. त्याचा राग आल्याने मंगल गुप्ताच्या  डोक्यात दगड आणि वीट घालून खून केल्याचे आरोपी शुभम याने सांगितले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ व पथकाने केली आहे.