चाकणमध्ये प्रेमप्रकरणामधून दोघांची हत्या ; पोलिसांनी नऊ जणांना घेतले ताब्यात

मारहाणीत झाला दोघांचा मृत्यू

    पुणे : प्रेम प्रकरणातून झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने शनिवारी पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली. चाकणमध्ये प्रेम प्रकरणातून मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी मिळून दोघांची हत्या केली. वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने दोघांना मारहाण केली. यातच दोघांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे लक्षात येताच पोलिसांना दोन मृतदेह असल्याचे सांगत पळ काढला. दुर्दैवी योगायोग म्हणजे हॉटेल ‘माणुसकी’त ही घटना घडली. या प्रकरणाची सध्या जिल्ह्यात चर्चा होत असून, पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रियकराच्या पत्नीचा सहभाग असल्याचेही पोलीस तपासातून समोर आले. बाळू सीताराम गावडे आणि राहुल दत्तात्रय गावडे अशी खून झालेल्यांची नावे आहेत. बाळू गावडे हा विवाहित होता. तो आरोपी वीटभट्टी मालक मरगज याच्याकडे कामाला होता. या संपूर्ण प्रकरणात वीटभट्टी मालक, मयत तरुणाची पत्नी मुक्ता बाळू गावडे हिच्यासह एकूण नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    वीटभट्टीवर काम करताना दोघांचे जुळले प्रेमसंबंध…
    या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे. मयत बाळू गावडे याचा विवाह झालेला होता. त्याला दोन मुलेही आहेत. दरम्यान, बाळू करंजविहिरे येथील वीटभट्टीवर कामाला होता. मे महिन्यात वीटभट्टी मालक याच्या मुलीवर बाळूचे प्रेम जडले. तर, त्यानंतर २१ वर्षीय तरुणीनं बाळूच्या प्रेमाला होकार दिला. दोघांच्या प्रेमसंबंधांची माहिती बाळूचा मित्र राहुल गावडे याला होती. दरम्यान, १५ जुलै रोजी त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि तसा प्लॅनही केला. यात राहुलने दोघांना मदत केली. राहुलनेच या दोघांना खोपोली परिसरात दुचाकीवरून सोडले होते.

    लोखंडी रॉड व लाकडी दंडुक्यांनी बेदम मारहाण
    मुलगी आणि वीटभट्टीवर काम करणारा बाळू बेपत्ता झाल्यानंतर वीटभट्टी मालकाचा संशय बळावला. त्यांनी दोघांचाही शोध घेण्यास सुरू केला. दरम्यान, शोध घेतला जात असताना राहुल गावडे हा मुलीच्या वडिलांना मदत करत असल्याचे नाटक करत होता. शोध सुरू असताना १६ जुलै रोजी बाळू आणि २१ वर्षीय मुलीला शोधण्यात यश आले. त्यांना आरोपीच्याच हॉटेल माणुसकी येथे आणण्यात आले. त्यानंतर राहुलने दोघांना मदत केल्याचेही उघड झाले. त्यानंतर मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी बाळूसोबत राहुलला तापलेल्या लोखंडी रॉड व लाकडी दंडुक्यांनी बेदम मारहाण केली. यात बाळूची पत्नी मुक्ता ही देखील यात सहभागी होती. तिने देखील मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याच मारहाणीत राहुल आणि बाळूचा मृत्यू झाला आहे. तर, २१ वर्षीय तरुणी जखमी झाली. जुलै रोजी बाळू आणि २१ वर्षीय मुलीला शोधण्यात यश आले. त्यांना आरोपीच्याच हॉटेल माणुसकी येथे आणण्यात आले.

    आणि पोलिसांना केला फोन…
    बाळू गावडे आणि राहुल गावडे यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीच्या वडिलांनी चाकण पोलिसांना फोन केला. हॉटलेमध्ये दोघांचे मृतदेह असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांची पाहणी केली. मृतदेह बघितल्यानंतर पोलिसांना खूनाचा संशय आला. त्यानंतर तरुणीच्या वडिलांची पोलिसांनी उलट तपासणी केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच सर्व सत्य समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी २१ वर्षीय तरुणीच्या वडिलांसह एकूण ९ जणांना बेड्या ठोकल्या.