दिलासादायक! पुण्यात बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त ; चोवीस तासांत २ हजार ४०७ रुग्णांना डिस्चार्ज , नवीन कोरोनाबाधित १ हजार १६४

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर असलेला कमालीचा ताण आता निवळताना दिसतो आहे. दररोजच्या कोरोनाबाधितांची संख्या वेगाने कमी होत असून उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय रीत्या वाढलेली आहे. रेमडेसिविर आणि प्राणवायूचा तुटवडा तूर्तास जाणवत नाही.

    पुणे : शहरात मागील चोवीस तासांत नवीन १ हजार १६४ कोरोना बाधितांची भर पडली असून बरे झालेल्या २ हजार ४०७ रुग्णांना घरी साेडण्यात आले आहे. दरम्यान पुण्यातील ४८ रुग्णांसह ७२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

    शहरातील सक्रीय रुग्णसंख्या १५ हजार २३२ पर्यंत कमी झाली आहे. यापैकी १ हजार ३४८ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. आतापर्यंत ४ लाख ६२ हजार १७२ पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी ४ लाख ३९ हजार ९७ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७ हजार ८४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील चोवीस तासंात १० हजार ८०६ संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

    -पिंपरीत कोरोनास्थिती सुधारली
    वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर असलेला कमालीचा ताण आता निवळताना दिसतो आहे. दररोजच्या कोरोनाबाधितांची संख्या वेगाने कमी होत असून उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय रीत्या वाढलेली आहे. रेमडेसिविर आणि प्राणवायूचा तुटवडा तूर्तास जाणवत नाही. कृत्रिम श्वसनयंत्रणा सज्ज खाटांची मागणी असली, तरी त्या उपलब्ध होत आहेत. मृत्यूची संख्या कमी झालेली असली, तरी सध्याची आकडेवारी चिंता निर्माण करणारी आहे.

    “कोरोना रुग्णांची संख्या कमी होते आहे. पालिका रुग्णालये तसेच करोना केंद्रांमधील खाटा मोठ्या प्रमाणात रिकाम्या आहेत. प्राणवायू खाटा तसेच कृत्रिम श्वसनयंत्रणा सज्ज खाटाही उपलब्ध होत आहेत. रेमडेसिविरची कमतरता नाही. प्राणवायूचा तुटवडा नाही. अशी दिलासादायक परिस्थिती असली, तरी यापुढेही नागरिकांनी काळजी घेतलीच पाहिजे. बरे होऊन गेलेल्या रुग्णांनीही गाफील न राहता खबरदारी घेतली पाहिजे,” असे पिंपरीच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी म्हटलं आहे.