पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच

२०५ रुग्णांची वाढ तर ७ जणांचा मृत्यू जनता वसाहत आणि बिबवेवाडीतील रुग्णसंख्येत झपाट्याने होतेय वाढ पुणे : लॉकडाउन शिथील झाल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये कोरोना

२०५ रुग्णांची वाढ तर ७ जणांचा मृत्यू 

जनता वसाहत आणि बिबवेवाडीतील रुग्णसंख्येत झपाट्याने होतेय वाढ

पुणे : लॉकडाउन शिथील झाल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे.  सुरवातीच्या काळात गुलटेकडी आणि पर्वती दर्शन परिसरात केंद्र राहीलेल्या कोरोनाने हळूहळू तळजाई वसाहत, बिबवेवाडी परिसर आणि जनता वसाहतीमध्येही शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी एकट्या बिबवेवाडी परिसरामध्ये तब्बल ४० रुग्ण आढळल्याने नागरिकांची पाचावर धारण बसली आहे.

      पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वप्रथम गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले. एका भाजीविक्रेत्यासोबतच त्याच्या मुलगा कोरोनाबाधित निघाल्यानंतर या परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली. याच दरम्यान पर्वती दर्शन वसाहतीमध्येही अवघ्या तीन ते चार दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा वाढला. तुलनेने सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या जनता वसाहतीतील नागरिकांनी ५० दिवसांहून अधिक काळ वसाहतीमध्ये कोरोनाचा प्रवेश होउ दिला नव्हता.

मात्र, लॉकडाउन तीन जाहीर झाल्यानंतर अर्थात तीन मे नंतर गुलटेकडी, पर्वती दर्शनसोबतच तळजाई वसाहत, बिबवेवाडी आणि जनता वसाहतीमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. जनता वसाहतीमध्ये अवघ्या पाच ते सहा दिवसांत तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून रुग्णसंख्या ४४ वर पोहोचली आहे. बिबवेवाडी गावठाणामध्येही मागील आठवड्यात कोरोना बाधित व्यक्ति सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांची तपासणी करण्यात आली. यामुळे गावठाण आणि परिसरातील सोसायट्यांमधील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. यानंतर पालिका प्रशासनाने या परिसरातील स्वॅब टेस्टिंगची संख्या वाढविली आहे. यामुळे अधिकाअधिक बाधीत समोर येत आहेत. विशेष असे की मतदारसंघामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील भुसार बाजारातील व्यापारी आणि कर्मचारीही येथेच जवळपासच्या परिसरामध्ये राहातात. व्यापारी कुटुंबातील १० ते १२ जणांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे.

सकारात्मक बाब अशी की पहिल्यांदा ज्या पर्वती दर्शन वसाहतीमध्ये रुग्ण मोठ्याप्रमाणावर समोर आले, तेथील संसर्गाचे प्रमाण बर्‍याच अंशी कमी झाले आहे. महापालिकेने हा परिसर कन्टेंन्मेंट झोन घोषित करून आरोग्य आणि जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याने, नवीन बाधितांचे प्रमाण मंदावल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी नमूद केले.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत नव्याने ४६ रूग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. येथे एकाच दिवशी रुग्ण वाढल्याचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. येथील एकुण कोरोना बाधितांची संख्या ३११ झाली असून १६९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. १३५ ऐक्टिव रुग्णांवर उपचार सुरू आहे.

कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत आपण केलेल्या टेस्टिंग लॅबच्या मागणीवर सकारात्मक पावले उचलायला सुरुवात झाली असून पुणे महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ससूनमध्ये नव्याने टेस्टिंग मशीनची खरेदी केली जाणार आहे. याचा फायदा पुणे शहराची टेस्टिंग क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे. याबाबतच्या तांत्रिक प्रक्रियाही वेगाने पूर्ण केल्या जाणार असून निधी राज्यसरकार आणि आपली पुणे महापालिका उभारणार आहे. नव्या टेस्टिंग लॅबची मागणी आणि सद्यस्थितीत यावरही बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कळविली आहे. 

– दिवसभरात ९२ रुग्णांना डिस्चार्ज.

– सात करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.

– १७० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६०३.

(डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-४१७५ आणि ससून ४२८)

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १८९२.

– एकूण मृत्यू -२४८.

-आजपर्यंत एकूण डिस्चार्ज- २४६३.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १७२३.