जुन्या भोसरी रूग्णालयाचा कायापालट होणार

महापालिकेचे जुने भोसरी रूग्णालय फक्त महिला प्रसुतीगृह व नवजात शिशू (एनआयसीयू) यांच्यासाठी अद्ययावत रूग्णालय उभारण्यासाठी विस्तारीत करण्यात येणार आहे.

    पिंपरी:  पिंपरी – चिंचवड महापालिकेचे जुने भोसरी रूग्णालय फक्त प्रसुतीगृह व नवजात शिशू (एनआयसीयू) यांच्यासाठी अद्ययावतपणे विस्तारीत करण्यात येणार आहे. या कामासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रकल्प खर्चाच्या १.९५ टक्के शुल्क देण्यात येणार आहे.

    महापालिकेचे जुने भोसरी रूग्णालय फक्त महिला प्रसुतीगृह व नवजात शिशू (एनआयसीयू) यांच्यासाठी अद्ययावत रूग्णालय उभारण्यासाठी विस्तारीत करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिका सभेमार्फत ३१ मार्च २०२१ रोजी १० कोटी रूपये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामाचे नियोजन करण्यासाठी वास्तुविशारद नेमणूक करणे आवश्यक आहे.

    या कामाचे नकाशे, प्रकल्प आराखडा तयार करणे, बांधकाम परवानगी घेणे, स्ट्रक्चरल डिझाईन तयार करणे आदी निविदापूर्व आणि निविदा पश्चात कामे करावी लागणार आहेत. त्याकरिता स्थापत्य विभागामार्फत कार्यकारी अभियंता यांच्या मंजुरीनुसार वास्तुविशारद यांची दरसुची ३ जून २०२१ रोजी मागविण्यात आली आहे. त्यानुसार, ड्रीम डिझायनर आर्कीटेक्टस, पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    या वास्तुविशारदांनी यापूर्वी देखील अशा प्रकारची कामे केली आहेत. सध्या काही कामे प्रगतीपथावर आहेत. या बाबींचा विचार करता या कामांसाठी ड्रीम डिझायनर आर्कीटेक्टस यांना निविदापूर्व कामासाठी ०.५० टक्के आणि निविदा पश्चात कामांसाठी १.४५ टक्के असे एकूण प्रकल्प खर्चाच्या १.९५ टक्के शुल्क देण्यात येणार आहे.