कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे पॅकेजिंग इंडस्ट्री अडचणीत; केंद्र व राज्य सरकारने त्वरित लक्ष देणे आवश्यक

गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच पॅकेजिंग इंडस्ट्रीवर बिकट परिस्थिती ओढावली आहे. तोडगा न निघाल्यास हा व्यवसाय बंद पडेल. व्यवसायावर अवलंबून असलेले जवळपास चार हजार कामगार बेरोजगार होतील. चालू असलेली दरवाढ अजून किती प्रमाणात वाढणार आहे याचाही अंदाज वर्तविण्यात येऊ शकत नाही

    पिंपरी: पॅकेजिंग इंडस्ट्रीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. ८० टक्क्यापर्यंत झालेल्या दरवाढीमुळे पॅकेज इंडस्ट्रीला उतरती कळा लागली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्वरित लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी महाउद्योजक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

    पुणे जिल्ह्यात सहाशे कोरोगेटेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत.पिंपरी, चिंचवड, चिखली, तळवडे, भोसरी, चाकण, पुणे आणि रांजणगाव या औद्योगिक परिसरातील कोरोगेटेड उत्पादकांची महत्त्वपुर्ण बैठक नुकतीच पार पडली. महाउद्योजक संघाचे अध्यक्ष संजय भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अनिल भालेकर, भावेश दाणी, सुनील अगरवाल, संजीव मिश्रा, रवि सचदेव, नवीन सरोगी, स्वप्नील चौधरी, संतोष गोरे, विशाल अजमेरा, अशोक चांडक, अमित जाधव, हेमंत कुशारे, नाना आवारे, प्रतीक पवार, जगमोहन अग्रवाल आदी उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संजय भालेकर यांनी दिला.

    भावेश दाणी म्हणाले, दैनंदिन जीवनात खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू सुबक पॅकेजिंग मध्ये मिळतात. पॅकेजिंग हे नुसते दिखाऊपणासाठी नसून खरेदी केलेल्या मालाच्या सुरक्षेसाठी ही तितकेच महत्त्वाचे असते. पॅकेजिंग इंडस्ट्रीला उतरती कळा लागणे म्हणजेच संपूर्ण उत्पादन क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटा आहे. सातत्याने होणाNया दरवाढीमुळे घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करत असताना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. सध्या त्यावर हजारो कुटुंबे अवलंबित आहेत. या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. श्रीपती एंटरप्राइजेसचे प्रतिक पवार म्हणाले, ८० टक्के झालेल्या दरवाढीमुळे इंडस्ट्रीज बंद पडण्याची वेळ आली आहे. अनेकांना बेरोजगार व्हावे लागणार आहे.

    एस. आर. पेपरचे संजीव मिश्रा म्हणाले, गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच पॅकेजिंग इंडस्ट्रीवर बिकट परिस्थिती ओढावली आहे. तोडगा न निघाल्यास हा व्यवसाय बंद पडेल. व्यवसायावर अवलंबून असलेले जवळपास चार हजार कामगार बेरोजगार होतील. चालू असलेली दरवाढ अजून किती प्रमाणात वाढणार आहे याचाही अंदाज वर्तविण्यात येऊ शकत नाही असेही ते म्हणाले. परफेक्ट पॅकेजिंगचे बी. जी. चौधरी म्हणाले, गेली वीस वर्षे आपण या व्यवसायात असून एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देण्याची वेळ पहिल्यांदाच येऊन ठेपली आहे. वेंâद्र सरकारने निर्यात होणारा माल तातडीने थांबवावा. स्थानिक उद्योग – व्यवसायांना उभारी देण्यासाठी प्रयत्न करावा.