पंचायत समितीत एक खिडकी योजना कार्यान्वित करणार : सभापती अश्विनी कानगुडे

कर्जत : कर्जत तालुक्यातील जनतेला आपले काम करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात विनाकारण हेलपाटे मारावे लागतात. यात जनतेचा वेळ व पैसा खर्च होतो. तसेच सर्वात जास्त मनस्ताप ही मोठ्या प्रमाणात पदरात पडतो म्हणून कर्जतच्या पंचायत समिती सभापती अश्विनी कानगुडे यांच्या संकल्पनेतून त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीत एक खिडकी योजना नागरिकांनासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जत पंचायत समितीमध्ये नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देवून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सभापती कानगुडे यांनी गटविकास अधिकारी अमोल जाधव यांना एक खिडकी योजना लगेच कार्यान्वित करण्याच आदेश दिले आहेत. सभापती कानगुडे यांनी कर्जत तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यालयातील अधिकारी वर्गासोबत मिटींग करून तालुक्यात नविन उपक्रम राबविण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.

विविध प्रलंबित कामांचा घेतला आढावा
वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुभाष कु-हाडे यांना सुचना करून त्याच्या कडील प्रलंबित व नविन २५० ट्रांसफार्मरची ( डीपी ) जोडणी २९ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून देण्यासाठी सुचना केली आहे व ही सुचना कु-हाडे यांनी मान्य केली असून महावितरण कंपनी शेतकरी वर्गासोबत असून शेतकरी वर्गावर अन्याय करणारे नाही, असे ही कु-हाडे यांनी स्पष्ट केले. तर महसुल विभागाकडील प्रलंबित असणारे प्रश्न व रेशीम कार्ड बाबतीत असणाऱ्या तक्रारी व संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील प्रकरणे तातडीने मार्गी लावले जातील,असे आश्वासन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सभापती अश्विनी कानगुडे यांना दिले आहे. तसेच कुकडी जलसिंचन विभाग व भूमापन विभाग आणी बांधकाम विभाग येथील अधिकाऱ्यांशी कानगुडे यांनी प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली आहे व तेही प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढले जातील, असे सभापती अश्विनी कानगुडे यांनी सांगितले. राशीन यथील जिजाई लॉन्स येथे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या २९सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कर्जत तालुक्यातील नागरिकांना पिठाची चक्की वाटप , बेबी किटचे वाटप तसेच या उपक्रमातून उपलब्ध होणारे नवीन रेशनकार्ड , विविध दाखल्यांचे वितरण हे सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले जाणार असल्याची माहिती सभापती अश्विनी कानगडे यांनी दिली .