कैऱ्या महागल्याने यंदा लोणच्याची चव महागणार; आंब्याच्या किमतीत दुप्पट वाढ

मागील वर्षापेक्षाही यंदा आंबा दुप्पटीने जवळपास सहा रुपये प्रती नग झाला आहे. यात खाराचा आंबा महागला असून, लोणच्याची चव चाखणाऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे.

    पिंपरी: दरवर्षी ३०० रुपये शेकडा मिळणारा लोणच्याचा आंबा यंदा सहाशे रुपये शेकड्यांनी बाजारात विकला जात आहे. परिणामी, यंदा लोणच्याची चव महागण्याची शक्यता आहे. मागील वर्षापेक्षाही यंदा आंबा दुप्पटीने जवळपास सहा रुपये प्रती नग झाला आहे. यात खाराचा आंबा महागला असून, लोणच्याची चव चाखणाऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे.

    ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पावसाळा व हिवाळ्यात दररोजच्या भोजनासोबत आंब्याच्या लोणच्याचा सर्रास वापर केला जातो. पूर्वीच्या काळातील गावरान आंब्यांचे झाडे वृक्ष तोडीमुळे कमी झाले. त्यातही या वर्षात आहे त्या झाडांना आबा फळ चांगले आले आहे. परंतु, मागील १५ दिवसांपासून सायंकाळी अधूनमधून दररोज वादळी वारा सुटत आहे. याचा फटका आंब्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने ‘ब्रेक द चेन’ माध्यमातून विकेंड लॉकडाऊन सुरु केला आहे. यात अनेकांनी घरात राहण्याकडे कल दिला असून, या परिस्थितीमुळे कसलीही कमाई नसून, आलेला दिवस कसा काढायचा ? या चिंतेत असंख्य नागरिक आहेत. यातच दररोजच्या जेवणात सर्रास वापर केले जाणारे लोणचेही आता महागले आहे.