पंतप्रधानांचा  अवघ्या चार तासात लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय कोरोनाच्या लढ्यासाठी पूरक ठरला : चंद्रकांत पाटील

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पक नेतृत्वामुळे अन्य देशांच्या तुलनेत आपला देश कोरोनाचा यशस्वी मुकाबला करतोय. अवघ्या चार तासात लॉकडाउन जाहीर करण्याचा निर्णयही देशातील साथ आटोक्यात

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पक नेतृत्वामुळे अन्य देशांच्या तुलनेत आपला देश कोरोनाचा यशस्वी मुकाबला करतोय. अवघ्या चार तासात लॉकडाउन जाहीर करण्याचा निर्णयही देशातील साथ आटोक्यात ठेवण्यासोबतच कोरोनाच्या लढ्याच्या तयारीसाठी पूरक ठरला. लॉकडाउनच्या अंमलबजावणीस उशिर झाला असता तर चित्र भयाण असले असते, असा दावा करतानाच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसर्‍या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अनेक दशकांच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय घेतले, असा दावाही भाजपचे प्रदेशअध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत केला.

अल्पकाळात लॉकडाउन जाहीर करण्याचे समर्थन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की लॉकडाउन जाहीर करण्यात आणि अंमलबजावणी करण्यात वेळ दिला असता तर मूळ गावी जाणारे हजारो लोक बाहेर पडून चेंगराचेंगरी सारखे संकट निर्माण झाले असते. तातडीने लॉकडाउनची अंमलबजावणी झाल्याने ही परिस्थिती तर टळली त्याचवेळी राज्य सरकारांना पुरेशी तयारी करण्यास वेळ मिळाला. यामुळेच देशभरात तातडीने आरोग्य सेवा उभारण्यास मदत मिळाली. राज्य सरकारांनीही परप्रांंतीय मजूर, गरिबांच्या अन्नपाणी, निवार्‍याची सुविधा करण्यासाठी वाव मिळाला. जगातील १४ देशांच्या लोकसंख्येएवढी एकट्या भारताची लोकसंख्या आहे. परंतू या जागतिक संकटात या १४ देशातील कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या भारतापेक्षा २२ पट अधिक आहे. तर मृत रुग्णांची संख्याही ५५ पट आहे. देशात पीपीई किटस्, मास्कची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली गेली आहे. राज्य सरकारांनाही मोठ्या प्रमाणावर मदत देण्यात आली आहे.  पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जनतेने देशभरात लॉकडाऊनचे पालन केल्यामुळेच कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य झाले.

पाटील म्हणाले,  कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांना मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने १ लाख ७० हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. कोट्यवधी लोकांना मोफत धान्य, शेतकर्‍यांना खात्यात थेट पैसे जमा करणे, गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देणे, जनधन खाते असलेल्या महिलांना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना थेट आर्थिक मदत करणे असे उपाय केंद्र सरकारने केले. शेतकर्‍यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठीच्या कायदेशीर सुधारणेसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणाही जाहीर करण्यात आल्या. शेतकरी, लघू उद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या पॅकेजमुळे देश कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल.

गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाकवर बंदी घालणे, अयोध्या येथे राम मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करून बांधकाम सुरू करणे तसेच पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमधील पीडीत धार्मिक अल्पंसख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा असे महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय घेतले. गेली अनेक दशके ज्यांची देशवासियांना आस होती, असे निर्णय या सरकारने घेतले आहेत आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.