संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

कारागृह प्रशासनाने अखेर कैद्याचे नातेवाइक आणि वकिलाशी संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर कैदी स्वतःहून कारागृहात हजर झाला. यामुळे कारागृह अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र, येरवडा कारागृह प्रशासनाकडून झालेल्या हलगर्जीपणाची कारागृह विभागाने गंभीर दखल घेऊन सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

    पुणे : साडेबारा कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला असतानाही येरवडा कारागृह प्रशासनाने कैद्याची सुटका केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारागृह प्रशासनाला झालेली चूक वेळीच लक्षात आल्याने कैद्याचे नातेवाइक आणि वकिलाशी संपर्क साधून हा प्रकार सांगण्यात आला. यानंतर कैदी पुन्हा कारागृहात परतला. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

    तेजस मोरे असे कैद्याचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मोरेवर साडेबारा कोटी रुपयांचा कर्जाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पिंपरीच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोरे याला अटक केल्यावर कोर्टाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. मागील महिन्यापासून मोरे कारागृहात शिक्षा भोगत आहे. फसवणूक प्रकरणी आपल्याला जामीन मिळावा म्हणून त्याने वकिलामार्फत कोर्टात अर्ज केला होता. पण कोर्टाने त्याचा जामीन फेटाळला होता. मात्र, कारागृह प्रशासनाने चुकून मोरे याची जामिनावर सुटका केली. हा प्रकार सुरुवातीला कोणाच्याही लक्षात आला नाही. पण काही वेळाने जामीन नाकारलेल्या कैद्याला सोडण्यात आल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

    त्यामुळे कारागृह प्रशासनाने अखेर कैद्याचे नातेवाइक आणि वकिलाशी संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर कैदी स्वतःहून कारागृहात हजर झाला. यामुळे कारागृह अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र, येरवडा कारागृह प्रशासनाकडून झालेल्या हलगर्जीपणाची कारागृह विभागाने गंभीर दखल घेऊन सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.