दुचाकी चोरांचा सुळसुळाट ; चाकण, एमआयडीसी, भोसरी परिसरातून अनेक दुचाकींची चोरी

स्पाईन सिटी मॉल येथील आईजी सुपरशॉपी समोर उभी केली. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास काम संपवून ते घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

    पिंपरी: चाकण परिसरातून चोरट्यांनी एक दुचाकी आणि एका मोटारकारचा सायलंसर चोरून नेला. तर एमआयडीसी भोसरी परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबत शनिवारी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    राहुल प्रकाश देव (वय ३२, रा. आंबेठाण चौक, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी देव यांनी इको मोटारकार (एम. एच. १४ / ए. एच. ९७८०) २९ एप्रिल रोजी रात्री हौसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी मोटारीचा १२ हजार रुपयांचा सायलेन्सर काढून चोरून नेला. हा प्रकार ३० एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आला.

    कृष्णा जयराम मोरे (वय ३०, रा. सुभाषवाडी, निघोजे) यांनी दुचाकी चोरीबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरे यांनी स्प्लेंडर प्लस दुचाकी (एम. एच. १४ / ई. क्यू. १७९७) ३० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता व्हेराक कंपनीच्या बाहेर उभी केली. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ते कंपनीतून बाहेर आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

    राकेश चंद्रकांत चव्हाण (वय ३९, रा. गायकवाडनगर, दिघी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चव्हाण २८ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास स्पाईन सिटी मॉल येथे कामासाठी गेले. त्यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी स्पाईन सिटी मॉल येथील आईजी सुपरशॉपी समोर उभी केली. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास काम संपवून ते घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

    विठ्ठल आत्माराम देसले (वय ४०, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी देखील एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी (एम.एच. १४ / सी.बी. ०९९२) चोरट्यांनी संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, मोशी येथून चोरून नेली. सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.