कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित

महापालिका प्रशासनाने यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि जिजामाता रुग्णालयात बालरुग्णांसाठी बेड आणि घरकुलात कोविड सेंटरची व्यवस्था केली आहे.तसेच यासाठी टास्क फोर्सचीही स्थापना करण्यात आली आहे. मोठ्या खासगी रुग्णालयांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे प्रशासन सुरळीत चालेल - राजेश पाटील , महापालिका आयुक्त

  पिंपरी: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. याअंतर्गत विविध अधिकाऱ्यांकडे वेगवेगळया जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.समन्वया अभावी ऐनवेळी शहरात गोंधळ उडणार नाही यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

  कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आणि उपाययोजनेसाठी महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क आहे. तिसरी लाट अधिक तीव्र असू शकेल असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. तातडीने करावयाचा उपाययोजना आणि रुग्णसंख्या कोणत्याही परिस्थितीत वाढू नये, ती आटोक्यात ठेवण्यासाठीचे नियोजन महापालिकेने केले आहे.महापालिका प्रशासनाने यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि जिजामाता रुग्णालयात बालरुग्णांसाठी बेड आणि घरकुलात कोविड सेंटरची व्यवस्था केली आहे.तसेच यासाठी टास्क फोर्सचीही स्थापना करण्यात आली आहे. मोठ्या खासगी रुग्णालयांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे प्रशासन सुरळीत चालेल , असा दावा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केला आहे.

  अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली जबाबदारी पुढीलप्रमाणे :

  सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर (कोरोना वॉर रुमचे मुख्य समन्वयक) : शहरातील सर्व वॉररुम , क्षेत्रीय अधिकारी , क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी आणि महापालिका यांच्यात समन्वय ठेवणे.तिसऱ्या लाटेसाठी पूर्व तयारी आणि कोरोनाविषयक शासकीय आणि महापालिका आदेशाची अंमलबजावणी करणे.अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचण्यांवर देखरेख ठेवणे.

  सहायक आयुक्त प्रशांत जोशी (माहिती संकलन समन्वयक) : ‘ मी जबाबदार ‘ अ‍ॅपव्दारे टेस्टींग लॅब, कोविड केअर सेंटर, रुग्णालयांकडून माहिती संकलन अचूक वेळेत होईल.कोरोना पोर्टल, आयसीएमआर पोर्टलवरील महापालिकेची माहिती अद्यावत राहील यावर पर्यवेक्षण आणि नियंत्रण ठेवणे.

  उपायुक्त संदीप खोत (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग समन्वयक) : कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना शोधणे, त्यांच्या पत्ता ,मोबाईल क्रमांक आणि आधारकार्ड क्रमांक आदी माहिती घेणे.बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे १०० टक्के कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग , तसेच ‘ मी जबाबदार ‘ अ‍ॅपवर नोंदणी होईल यावर पर्यवेक्षण आणि नियंत्रण ठेवणे.

  उपायुक्त मंगेश चितळे (जनजागृती समन्वयक) : जनजागृतीसाठी संपूर्ण शहरामध्ये फ्लेक्स आणि होर्डिग्ज लावणे.सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि रुग्णालयांशी समन्वय ठेऊन कोरोना संदर्भातील जनजागृतीसाठी नियोजन करणे.महापालिकेचे सर्व विभाग ,शासकीय कार्यालये, मीडिया पार्टनर, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, यांचा समन्वय ठेवणे.