मुलाची गुटखाविक्री पित्याच्या अंगलट ; पारगावमधील पोलिस पाटलांची ‘पाटीलकी’ रद्द

गणेश लाेंढे पोलिस पाटील शिवाजी ठकाजी लोंढे यांचा मुलगा असून जप्त मुद्देमाल ज्या ठिकाणी आढळून आला ते ठिकाण पोलिस पाटील शिवाजी लोंढे यांच्या मालकीचे असल्याने शिवाजी लोंढे यांना पोलिस पाटील पदावरुन काढून टाकण्याचा अहवाल पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण यांना मंचर पोलिस ठाण्याच्या वतीने पाठविण्यात आला होता.

  मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव येथील पोलिस पाटील शिवाजी लोंढे यांच्या मुलाने अवैध गुटखाविक्री केल्याचे प्रकरण पोलिस पाटील यांच्या अंगलट आले आहे. पोलिस आणि महसुल विभागाने केलेल्या चौकशीत पोलिस पाटील दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे पोलिस पाटील पद रद्द करण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांनी जारी केले आहेत.
  मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पारगाव येथील संगम हार्डवेअर या दुकानामध्ये चोरुन गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिस निरिक्षक सुधाकर कोरे यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळाली. चौकशी दरम्यान बेकायदेशीर गुटखा विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन १३ हजार ८१२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी गणेश शिवाजी लोंढे (वय ३६ रा. पारगाव) यांना अटक करण्यात आली.

  म्हणणे मांडण्याची दिली संधी
  गणेश लाेंढे पोलिस पाटील शिवाजी ठकाजी लोंढे यांचा मुलगा असून जप्त मुद्देमाल ज्या ठिकाणी आढळून आला ते ठिकाण पोलिस पाटील शिवाजी लोंढे यांच्या मालकीचे असल्याने शिवाजी लोंढे यांना पोलिस पाटील पदावरुन काढून टाकण्याचा अहवाल पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण यांना मंचर पोलिस ठाण्याच्या वतीने पाठविण्यात आला होता. ग्रामीण पोलिस अधिक्षकांनी पारगाव येथील पोलिस पाटील यांना निलंबित करुन पुढील कारवाई करण्याबाबत कळविले. पोलिस निरिक्षकांच्या अहवालानुसार पारगावचे पोलिस पाटील यांना लेखी आणि तोंडी म्हणणे मांडण्याकरिता संधी देण्यात आली.
  पोलिस पाटील यांनी त्यांचे लेखी म्हणणे सादर केले असून त्यामध्ये पोलिस पाटील यांनी त्यांना दोन मुले असून रेशनकार्ड मध्ये नाव एकत्र आहेत. परंतु ती त्यांच्यापासून विभक्त राहत असल्याबाबत नमुद केले आहे.

  सेवेतून निलंबित करण्याचे आदेश
  मंडल अधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबामध्ये पारगाव येथील संगम हार्डवेअर या ठिकाणी चोरुन गुटखा विक्री होत असून त्याकडे घरगुती कारणास्तव जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा पोलिस पाटील शिवाजी लोंढे यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. शिवाजी ठकाजी लोंढे यांनी कर्तव्य पार पाडण्यात कसुर केला असल्याचे सिद्ध होत असल्याने मंचर विभागाचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर यांनी पोलिस पाटील शिवाजी लोंढे यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश गुरुवारी (दि. १) दिले आहेत, असे पोलिस निरिक्षक सुधाकर कोरे यांनी सांगितले.