politics of corona virus vaccine

पुणे : रशियाच्या स्पुटनिक-५ या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात करण्यात येत आहे. पुण्यातील नोबेल रुग्णालयात ही चाचणी सुरु झाली असून १७ स्वयंसेवकांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. लस देण्यात आलेल्या सर्वांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

लसीच्या क्लिनिकल चाचणीमध्ये ट्रायल प्रोटोकॉलचं पूर्णपणे पालन केलं जात आहे. ज्या लोकांना ही लस देण्यात आली आहे, त्यांचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे नोबेल रुग्णालय प्रशासनाकडून सांगिण्यात आले.

गॅमेलेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) हे संयुक्तरित्या स्पुटनिक-५ ही लस तयार करत आहे. भारताने रशियाकडून या लसीचे १०० मिलियन (१० कोटी) डोस खरेदी केल्याची माहितीही समोर येत आहे.

१७ तंदुरुस्त स्वयंसेवकांना गेल्या तीन दिवसांत स्पुटनिक-५ या लसीचे डोस देण्यात येत आहेत. ही रोगप्रतिबंधक लस टोचण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरु झाली आहे. प्रोटोकॉलनुसार, चाचणीसाठी निरोगी स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे.