श्रीक्षेत्र वढूची माती अयोध्येच्या रामजन्मभूमीला

शिक्रापूर : अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ असलेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील माती पाठवण्यात आली असल्याचे माजी उपसरपंच संतोष शिवले यांनी सांगितले. अयोध्यामध्ये पुढील आठवड्यात श्रीराम मंदिराचा भव्य भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या मृदेची विधिवत पूजा करून ही मृदा गोविंदगिरी महाराजांकडे सुपूर्द करण्यात आली. या मृदेचे चांदीच्या कलशामध्ये श्रीक्षेत्र वढू आणि हिंदू जागरण मंचच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांच्याकडे ही मृदा सुपूर्द करण्यात आली. यावेळी धर्म जागरण मंचाचे राजेंद्र गावडे व निलेशजी भिसे, माजी उपसरपंच संतोष शिवले, महेश यशवंत, रामदास शिवले, अविनाश मरकळे यासह श्रीक्षेत्र वढू येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वढू येथे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असल्याने या क्षेत्राला इतिहास महत्वाचे स्थान आहे. त्यात अशा पवित्र ठिकाणची माती श्रीराम मंदिरासाठी जाणार असल्याने वढूला विशेष स्थान प्राप्त झाले आहे.