बेलवाडी (ता इंदापूर) येथील दादासाहेब जामदार या तरुणाने शेतातील ज्वारीचे पीक पाखरांसाठी राखून ठेवले आहे.
बेलवाडी (ता इंदापूर) येथील दादासाहेब जामदार या तरुणाने शेतातील ज्वारीचे पीक पाखरांसाठी राखून ठेवले आहे.

चिमण्यांबरोबरच पोपट व इतर पक्षीही जामदार यांच्या शेतात येऊ लागले.जामदार यांनी त्यांच्या गोठ्यात व घराशेजारील झाडांवर बर्ड फिडर बसविले आहेत.सुमारे१५० हून अधिक चिमण्या घराच्या परीसरात घरटी करून राहत आहेत.दादासाहेब जामदार यांचे वडिल दत्तात्रय जामदार यांना ‌देखील या चिमण्यांचा लळा लागला आहे. बर्ड फिडर मध्ये दादासाहेब ‌व त्यांचे वडिल नियमितपणे चारा भरत असतात.

    अमोल तोरणे, बारामती: “धर्म आहे ज्या कुळाचा, दोन करांनी देत जावे। शिवाराची होत सुगी पाखरांना तोषवावे।।” संत तुकाराम महाराज यांच्या ‌या अभंगा प्रमाणे बेलवाडी(ता.इंदापूर) येथील दादासाहेब दत्तात्रय जामदार या तरुणाने रानात मुक्तपणे वावरणाऱ्या ‌पाखरांसाठी स्वतःच्या शेतातील दहा गुंठे ज्वारीचे पीक सोडले आहे.

    दादासाहेब जामदार यांचे ‌वडिल‌ दत्तात्रय जामदार यांच्या हातावरील चारा खाताना चिमणी.

    सध्या ज्वारीला सोन्याचा भाव आला आहे. या पिकाच्या चाऱ्यालाही मोठी मागणी आहे. शेत शिवारात फिरणाऱ्या पाखरांसाठी मोठी गैरसोय निर्माण होत आहे. शेतातील उभ्या पीकातील धान्य पाखरांनी खाऊ नये, यासाठी शेतकरी खूप काळजी घेतात. अनेक शेतामध्ये बुजगावणे उभे करण्याची परंपरा अद्याप कायम आहे. खरंतर मोठ्या प्रमाणावर खर्च करून, काबाड कष्ट करून जोपासलेली पिके हाताच्या फोडाप्रमाणे शेतकऱ्यांना जपावी लागतात. उभ्या पिकांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा फटका शेती उत्पादनावर बसतो. त्यामुळे ज्वारी, बाजरी या पिकांची राखण शेतकऱ्यांना करावी लागते. त्यामुळे सहाजिकच चाऱ्यासाठी पाखरांना वणवण करावी लागते, या मुक्या जीवांना हक्काचा चारा मिळावा, यासाठी दादासाहेब जामदार यांनी दहा गुंठे शेत जमिनीत ज्वारीची लागवड केली आहे. सध्या हे पीक हिरवेगार आले आहे, यामध्ये ज्वारीची कणसे बहरली आहेत. मात्र दादासाहेब जामदार यांनी हे पीक पाखरांच्या चाऱ्यासाठी सोडले आहे, त्यामुळे दिवसभर विविध प्रकारची पाखरे या शेतामध्ये चाऱ्यासाठी गर्दी करत आहेत. पाखरांच्या चिवचिवाटाने हे शेत गजबजले आहे.चिमणी,पोपट,साळुंकी यासह इतर अनेक प्रकारचे पक्षी या शेतात दिवसभर असतात.दादासाहेब जामदार गेली ‌सहा वर्ष अशाप्रकारे हा उपक्रम राबवत आहेत.जामदार हे बेलवाडी गावच्या परीसरात शेतातील घरी कुटुंबियांसह राहत आहेत.सहा वर्षापुर्वी या परीसरात चिमण्या दिसू न लागल्याने दादासाहेब ‌जामदार अस्वस्थ झाले, त्यांनी याबाबत माहिती घेतली, त्यावेळी त्यांना हक्काचा चारा नसल्याने चिमण्या दुर्मिळ झाल्याचेे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आपल्याा शेतातील ज्वारीचे पीक पाखरांसाठी सोडण्याचे ठरवले. परिणामी न दिसणाऱ्या चिमण्या त्यांच्या शेतामध्ये दिसू लागल्या.

    चिमण्यांबरोबरच पोपट व इतर पक्षीही जामदार यांच्या शेतात येऊ लागले.जामदार यांनी त्यांच्या गोठ्यात व घराशेजारील झाडांवर बर्ड फिडर बसविले आहेत.सुमारे१५० हून अधिक चिमण्या घराच्या परीसरात घरटी करून राहत आहेत.दादासाहेब जामदार यांचे वडिल दत्तात्रय जामदार यांना ‌देखील या चिमण्यांचा लळा लागला आहे. बर्ड फिडर मध्ये दादासाहेब ‌व त्यांचे वडिल नियमितपणे चारा भरत असतात. दत्तात्रय जामदार यांनी चिमण्यांकडे आपला हात पुढे केल्यानंतर, या चिमण्या त्यांच्या हातावर, डोक्यावर येऊन बसतात, एवढा लळा या पाखरांना जामदार यांनी लावला आहे. शेतातील उभ्या पिकाबरोबरच वर्षभर बर्ड फिडर च्या माध्यमातून चिमण्यांना चारा व पाणी जामदार कुटुंबीय देत आहेत. मुक्या जीवांची मानवाप्रमाणेच काळजी घेणे गरजेचे आहे. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगा प्रमाणे मानवासोबत पशुपक्ष्यांच्या उदरनिर्वाहाची ‌जबाबदारी शेतकऱ्याची आहे, त्याप्रमाणे जामदार यांनी पाखरांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारले आहे. दरम्यान दादासाहेब जामदार हे हाडाचे कलाकार आहेत. त्यांचा फोटो फ्रेम मेकिंग चा व्यवसाय असून प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या प्रतिमा लाकडात कोरून त्या त्यांना भेट दिलेल्या आहेत. जामदार यांच्या कलाकुसरीला मोठी दाद दिली जाते. पाखरांच्या पालनपोषणाची त्यांनी घेतलेली जबाबदारी सर्वांना वेगळा संदेश देणारी आहे.