समाविष्ट गावांसाठी राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा- जगदीश मुळीक,भाजप अध्यक्ष   

गावांच्या समावेश केल्याने महापालिकेची लोकसंख्या वाढणार आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून तातडीने पुणे महापालिकेला १८.९४ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे. गावांसाठी अतिरिक्त पाणीसाठा द्यावा. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सेवकांच्या जागा रिक्त आहेत.

    पुणे: पुणे महापालिकेत २३ गावांचा समावेश केल्याने पुणे हे राज्यातील सर्वाधिक भौगोलिक क्षेत्रफळ असणारे शहर ठरणार आहे. महापालिकेत ११ गावांचा समावेश करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने विकासाला चालना दिली. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे आज झालेला २३ गावांचा समावेश आहे.

    नव्याने समाविष्ट गावांमध्ये गेली अनेक वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु त्यांना गावात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता आलेल्या नाहीत. गेली अनेक वर्षे ही गावे विकासापासून वंचित आहेत. या गावांमध्ये रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, मलनिःसारण, पथदिवे आदी पायभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने किमान दोन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा. केवळ गावे समाविष्ट करून आपली जबाबदारी महापालिकेवर ढकलू नये. कोरोनामुळे आधीच महापालकेवर मोठा आर्थिक भार आहे. राज्य शासनाने कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही.

    गावांच्या समावेश केल्याने महापालिकेची लोकसंख्या वाढणार आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून तातडीने पुणे महापालिकेला १८.९४ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे. गावांसाठी अतिरिक्त पाणीसाठा द्यावा. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सेवकांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी तातडीने मान्यता द्यावी. तसेच नवीन गावांसाठी सेवकवर्ग मंजूर करावा. १०० टक्के अनुदान मिळावे. यापूर्वीच्या ११ गावांचे ‘पीएमआरडीए’कडे असलेले विकसन शुल्क तातडीने महापालिकेकडे वर्ग करण्यात यावे.