कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानाला दिला ‘शहीदा’चा दर्जा

दापोडी येथे जलवाहिनीचे काम सुरु असताना खोदकाम केलेल्या २५ फुटी खोल खड्डयात व्यक्ती अडकल्या. त्यांना वाचविण्याचे काम करीत असताना महापालिकेचे फायरमन विशाल हणमंतराव जाधव यांना मातीच्या ढासळलेल्या ढिगाऱ्याखाली अडकून वीरमरण आले. आपला जीव पणाला लावून बचाव कार्यामध्ये असामान्य धाडस त्यांनी दाखवित प्राणाची आहुती दिली

  पिंपरी: दापोडीतील दुर्घटनेमध्ये अग्निशमन बचाव कार्य करत असताना वीरमरण आलेल्या पिंपरी – चिंचवड महापालिकेतील फायरमन विशाल जाधव यांना महाराष्ट्र शासनाने ‘शहीद’ दर्जा बहाल केला आहे. शहीदांना अनुज्ञेय असणाऱ्या सवलती आणि फायदे महापालिका निधीतून देण्यास महाराष्ट्र शासनाने मंजूरी दिली आहे.

  दापोडी येथे जलवाहिनीचे काम सुरु असताना खोदकाम केलेल्या २५ फुटी खोल खड्डयात व्यक्ती अडकल्या. त्यांना वाचविण्याचे काम करीत असताना महापालिकेचे फायरमन विशाल हणमंतराव जाधव यांना मातीच्या ढासळलेल्या ढिगाऱ्याखाली अडकून वीरमरण आले. आपला जीव पणाला लावून बचाव कार्यामध्ये असामान्य धाडस त्यांनी दाखवित प्राणाची आहुती दिली. ही घटना १ डिसेंबर २०१९ रोजी घडली. कल्याण – डोंबिवली महापालिका आणि मुंबई महापालिकेच्या धर्तीवर फायरमन विशाल जाधव यांना ‘शहीद’ दर्जा आणि सवलती मिळाव्यात असा ठराव सर्वसाधारण सभेने केला. त्या ठरावास मान्यता देत ‘शहीद’ दर्जा बहाल करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या बाबतचा शासन निर्णय नुकताच नगर विकास विभागाने निर्गमित केला आहे. नक्षलवाद विरोधात कारवाई करताना नक्षलवादी हल्ल्यात मृत आणि जखमी झालेल्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या धर्तीवर अनुज्ञेय असलेल्या सवलती आणि फायदे पिंपरी महापालिकेच्या निधीतून शहीद जाधव यांच्या कुटुंबियांना देण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे.

  शहीदांच्या कुटुंबियांना मिळणारे लाभ

  १) शहीद झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्याच्या कुटूंबियांना निवासी जिल्ह्यात पसंतीच्या ठिकाणी एक सदनिका विनामुल्य
  २) ज्या ठिकाणी म्हाडाची योजना असेल तेथे एक सदनिका देण्यात यावी.
  ३) सदनिका उपलब्ध नसेल तर अनुज्ञेय असलेल्या क्षेत्रफळानुसार ३ हजार रुपये प्रती चौरस फुट या दराने रोख रक्कम द्यावी.
  ४) वर्ग अ करीता १ हजार चौरस फुट, वर्ग ब करीता ८०० चौरस फुट, वर्ग क करीता ७५० चौरस फुट आणि वर्ग ड करीता ६०० चौरस फुट क्षेत्रफळ अनुज्ञेय राहील
  ५) शैक्षणिक अर्हता आणि पात्रतेनुसार कुटूंबियापैकी एकास अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती द्यावी.
  ६) २५ लाख रुपये सानुग्रह अनुदान कायदेशीर वारसदाराच्या संयुक्त नावाने मुदतठेव म्हणून देण्यात यावी.
  ७) हा निधी १० वर्षापर्यंत काढता येणार नाही.मात्र, व्याज रक्कम दर महिन्याला काढता येईल.
  ८) दोन अपत्यांचा देशांतर्गत शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण मोफत असेल.
  ९) वीरमरण आलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबियांना दरमहा वेतन