तलाठ्यांचे एकाच गावात ठाण ; दौंड व पुरंदरमधील बदल्या अनेक वर्षापासून प्रलंबित

गेल्यावर्षी कोरोनाच्या कारणास्तव दौंड तहसीलदार यांच्या आस्थापनेवर ४७ व पुरंदर तहसील यांच्या आस्थापनेवर ४२ तलाठी संवर्गातील एकूण ८९ पदे मंजूर आहेत व कार्यरत ८५ तलाठी आहेत. त्यापैकी १५ टक्के बदल्या करण्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली. यामध्ये पुरंदरमधील २१ तलाठ्यांपैकी ३ तलाठी पात्र ठरविण्यात आले. तर दौंड तालुक्यातील २६ तलाठी यांच्यापैकी ०३ तलाठी पात्र ठरविण्यात आले.

  सासवड : पुरंदर व दौंड तालुक्यातील महसुली कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. एकाच तालुक्‍यात अनेक वर्षे नोकरीला असल्याने पुरंदर तालुक्यातील महसूल विभागांमध्ये अनेक वेळा अफरातफरीची प्रकरणे समोर येत आहेत. राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर असल्याने तलाठ्यांच्या बदल्या होत नाहीत, असे नागरिकांच्या कडून बोलले जात आहे.

  जमिनीच्या खरेदी बेकायदेशीर नोंदी
  दौंड व पुरंदर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून तलाठी एकाच तालुक्‍यात कार्यरत असल्याने तलाठ्यांच्या मर्जीप्रमाणे गावाचा सजा घेणे, एजंट व मंडलाधिकाऱ्यांना हाताशी धरुन जमिनीच्या खरेदी खताच्या बेकायदेशीर नोंदी मंजुर करून बक्कळ पैसा कमवण्यासारखे प्रकार समोर येत आहेत. तलाठ्यांच्या बदलीच्या संदर्भात अनेक वर्षापासून दौंड व पुरंदर तालुक्यातील तलाठी तालुक्याच्या बाहेर जात नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. आखिल भारतीय ग्राहक हक्क पंचायतीचे उपाध्यक्ष सुदाम खेडेकर यांनी माहितीच्या अधिकारामध्ये सर्व कागदपत्रांची माहिती घेतली असता यामध्ये २० ते २३ वर्षापासून दौंड येथे तलाठ्यांच्या बदल्या होत नसल्याचे उघड झाले आहे.

  पुरंदर तालुक्यातील सहा तलाठी पात्र
  गेल्यावर्षी कोरोनाच्या कारणास्तव दौंड तहसीलदार यांच्या आस्थापनेवर ४७ व पुरंदर तहसील यांच्या आस्थापनेवर ४२ तलाठी संवर्गातील एकूण ८९ पदे मंजूर आहेत व कार्यरत ८५ तलाठी आहेत. त्यापैकी १५ टक्के बदल्या करण्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली. यामध्ये पुरंदरमधील २१ तलाठ्यांपैकी ३ तलाठी पात्र ठरविण्यात आले. तर दौंड तालुक्यातील २६ तलाठी यांच्यापैकी ०३ तलाठी पात्र ठरविण्यात आले. दौंड व पुरंदरमधून ०६ तलाठ्यांच्या बदल्यावर प्रशासनाने आपले शिक्कामोर्तब केले.

  वीस वर्षे कामे सुरू हाेती का?
  प्रशासनाकडून विधानसभा निवडणुका, टंचाई परिस्थिती, संगणकीकृत सातबारा, कोरोनाची परिस्थिती अशी व यासह अनेक कारणे देत तलाठ्यांच्या बदल्यांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक गेल्या २३ ते २४ वर्षापासून गाव कामगार तलाठी एकाच तालुक्यामध्ये काम करत आहेत. जर २३ ते २४ वर्षांपासून हे तलाठी एकाच ठिकाणी कार्यरत असतील तर गेल्या वीस वर्षापासून विधानसभा निवडणुका, टंचाई, सातबारा संगणकीकृत कोरोनाची कामे सुरू होती का हा ही प्रश्न अनुत्तरितच आहेत. पुरंदरमध्ये तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी अनेक वेळा कामात हलगर्जीपणा केला असल्याचे दिसून अाले आहे. अनेक मंडला अधिकाऱ्यांच्या चौकशा देखील सुरू आहेत.

  मंडलाधिकाऱ्याला गावातच कार्यभार कसा ?
  एक मोठ्या गावच्या मंडलाधिकाऱ्यांनी नुकतीच बेकायदेशीर नोंद मंजूर केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. त्यातच ते त्याच गावचे कायमस्वरूपी रहिवासी असून देखील त्यांना त्याच गावात मंडल अधिकारी पदाचा कार्यभार कसा दिला ? याची देखील चर्चा सध्या पुरंदर तालुक्यात जोर धरू लागली आहे. त्या मंडलाधिकाऱ्याबाबत प्रशासन आता काय निण;व घेणार ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

  नविन येणाऱ्या शासन शासन निर्णयानुसार बदल्या केल्या जातील. गेल्या वर्षी देखील बदल्या करण्यात अाल्या हाेत्या. यावर्षी देखील बदल्या केल्या जातील.

  -प्रमोद गायकवाड, उपविभागीय आधिकारी, दौंड-पुरंदर