शेतावर बिबटयाची आणि घराबाहेर कोरोनाची दहशत


भिमाशंकर  : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाटयाने वाढत असून, ग्रामीण भागालाही आता कोरोनाचा विळखा पडला आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे मुश्किलीचे झाले आहे. त्यातुनही आवश्यक खबरदारी घेऊन शेतकामे करायचे म्हटले, तर तेथे बिबटयाचा संचार वाढला आहे, अशा दुहेरी संकटात बळीराजा अडकल्याचे चित्र आंबेगाव तालुक्यात दिसत आहे. कोरोनाचा फैलाव जगभर झाला आहे, शहरांपाठोपाठ आता आंबेगाव तालुक्यातही कोरोनाने आपले हातपाय पसरवले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आंबेगाव जुन्नरच्या प्रभारी प्रांत तथा तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आदि विभागांचे अनेक प्रयत्न झाले आणि होत आहे.  आंबेगाव तालुक्यात साकोरे, महळुंगे पडवळ, लौकी, परांडा, नारोडी, कळंब इत्यादी भागांमध्ये मागील काही वर्षांपासून बिबटयाचा संचार वाढला आहे. कोरोना संसर्गामुळे घराबाहेर पडू नये, असे सांगितले जात असले तरी ग्रामीण भागात शेतकरी व मजुरांना शेतकामांसाठी घराबाहेर पडणे अनिवार्य आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने अनेकदा लॉकडाऊन व प्रतिबंधित क्षेत्र जाहिर केले, मात्र शेतातील कामे वेळेवर होणे आवश्यक असल्याने बळीराजाला शेतात जाणे भाग आहे. अशा स्थितीत घराबाहेर पडले की एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव, दुसरीकडे बिबटयाचा वाढता संचार यातून मार्ग काढत शेतकरी आवश्यक खबरदारी घेऊन शेतकामे उरकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता दिवसाही बिबटयाचे दर्शन होऊ लागल्याने शेतकरी व शेतमजूर या दुहेरी संकटामुळे भयभीत झाले आहे.