प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    नारायणगाव : नारायणगाव (ता.जुन्नर) येथील बसस्थानकावर एसटीची वाट पाहत बसणाऱ्या प्रवाशांना एकटे असल्याचे पाहून चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्याला नारायणगाव पोलिसांनी काही तासातच शिताफीने अटक केली.

    शुक्रवार (दि.२) रोजी प्रवासी निलेश जाधव (रा.हिंगोली) हे पहाटे एकच्या सुमारास आपल्या दोन साथीदारांसह नारायणगाव बस स्थानक येथे एसटीची वाट पहात बसले होते. त्यांच्याजवळ एक अज्ञात व्यक्ती आला. त्याने चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील १६०० रुपये हिसकावून घेतले, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. फिर्याद येताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिसांनी एसटी बस स्थानक शिवारात आरोपीला पकडण्यासाठी सापळा लावला.

    बसस्थानकाजवळील एका दुकानासमोर फिर्यादीने वर्णन केलेला आरोपी बसला होता. पोलिसांनी त्याला जाळ्यात पकडले. त्याला नाव विचारले असता, नितीन संजय जाधव (रा.आळकुटी,ता.पारनेर,जि. नगर) असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची झडती घेतली असता, त्याच्या जवळचे १६०० रुपये रोख रक्कम पोलिस तपासात मिळून आली. आरोपीला जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

    या गुन्ह्याच्या तपास पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ .अभिनव देशमुख, अप्पर सहायक पोलिस अधीक्षक विवेक पाटील, जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस कॉन्स्टेबल सचिन कोबल, लोहोटे, पोलिसमित्र आकाश खंडे, ढोबळे यांच्या पथकाने कारवाई केली. पुढील तपास नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक के. डी. ढमाले करीत आहेत.