चारचाकी विहिरीत पडून महिलेसह दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील घटना; गावासह परिसरात पसरली शोककळा वाघोली : (ता. हवेली) कच्च्या रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीत फोर व्हीलर पडून महिलेसह दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची

हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील घटना; गावासह परिसरात पसरली शोककळा  

वाघोली : (ता. हवेली) कच्च्या रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीत फोर व्हीलर पडून महिलेसह दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अष्टापुर (ता.हवेली) येथे मंगळवारी (दि.९) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. या अपघातात महिलेचे पती बचावले आहेत. तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले असून त्यांच्यावर बुधवारी (दि. १०) सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.शितल सचिन कोतवाल (वय ३३) यांच्यासह मुलगी सृष्टी कोतवाल (वय ८) व शौय कोतवाल (वय ५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून सचिन श्रीहरी कोतवाल बचावले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कोतवाल हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह राहू (ता.दौंड) येथे सासुरवाडीला गेले होते. तेथून परत येत असताना अष्टापूर येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळील एका शॉर्टकट रस्त्याच्या वळणावरील विहिरीत त्यांची फोर व्हिलर कोसळली. सचिन कोतवाल यांनी गाडीतून पत्नी व दोन मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीच्या काचा बंद असल्याने त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. विहिरीला संरक्षक कठडे नसल्याने फोर व्हिलर विहिरीत पडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची हवेली महसूल विभागाने गंभीर दखल घेतली आहे. घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे अष्टापूर गावावर व परिसरात शोककळा पसरली आहे.