महामार्गावरील भाजी मंडई ठरते अपघाताला निमंत्रण

इंदापूर  : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णीवेस नाक्याच्या परिसरात पहाटे चार वाजता सुरु होणारी भाजी मंडईची घाई अपघाताला निमंत्रण देणारी ठरेल, असे चित्र आहे. शहरातील नेहमीच्या जागी मंडई भरवली जावी, अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहे.

इंदापुरातील समस्या : गर्दीमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता
इंदापूर  : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णीवेस नाक्याच्या परिसरात पहाटे चार वाजता सुरु होणारी भाजी मंडईची घाई अपघाताला निमंत्रण देणारी ठरेल, असे चित्र आहे. शहरातील नेहमीच्या जागी मंडई भरवली जावी, अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहे.
इंदापूर शहरात सातबोळ परिसरातच अनेक वर्षापासून भाजी मंडई भरत आहे. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत तेथील उलाढाल चालते. तर नगरपरिषदेच्या पटांगणात रविवारी आठवडा बाजार भरत असतो. कोरोनाची साथ आल्यानंतर पहिल्या लॉकडाऊनपासून मंडई व आठवडा बाजार बंद झाले. सातबोळ परिसरात नंतरच्या काळात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने मंडई सुरुच झाली नाही. त्यानंतर लोकांची गैरसोय टाळण्यासाठी टेंभुर्णी वेस नाक्याच्या पुढे इंगोले मैदानावर जुन्या शहा रोडलगत मंडई व आठवडा बाजार भरवण्यात येऊ लागला. मात्र पावसाळ्यात तेथे चिखल होत असल्याने पालेभाज्या विक्रेते व ग्राहक यांची गैरसोय होऊ लागली. बुधवारच्या अतिवृष्टीमुळे तेथून जवळच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा मंडई व आठवडा बाजार भरवण्यात येत आहे.
पहाटे चार वाजता शेतमाल घेऊन शेतकरी येतात. गोल्डन हॉटेलपासून जुन्या शहा रस्त्यापर्यंतच्या भागात शेतीमालाची पोती रचली जातात. तेथेच व्यापाऱ्यांशी व्यवहार होतो. त्यानंतर मंडईचे कामकाज चालू होते.दरम्यानच्या काळात लोकांची व महामार्गावरुन येणाऱ्या वाहनांची महामार्गावर मोठी गर्दी होते. ट्रॅफिक जाम होते. मंडई सुरु असताना कमी अधिक प्रमाणात स्थिती तशीच असते. या आधी गर्दीमुळे एका आडत व्यापाऱ्याचा अपघाती मृत्यु  झाला होता. यापुढेही अशा दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
आत्ता शहरात कोठे ही लॉकडाऊन नाही. शहराची मुख्य बाजार पेठ व इतर व्यवहार सुरु आहेत. दसऱ्याला जीम देखील चालू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या ठिकाणी किमान मंडई भरवण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी,  अशी अपेक्षा लोकांमधून व्यक्त होत आहे. दिवाळी तोंडावर आहे.

बहुतेक भाजीपाला विक्रेत्यांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो. किमान त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रशासनाने ते पाऊल उचलावे.

-विनोद राऊत, भाजीपाला विक्रेते

नियंत्रणासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व विक्रेते, ग्राहक यांच्याकडून कोरोनाविषयक नियमांचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी मंडईच्या ठिकाणी नगरपरिषदेने आपले कर्मचारी मंडईच्या ठिकाणी नेमावेत, अशी नागरिकांनी केली आहे.