The ventilator from PM Care went bad; Sassoon's Dean's complaint to Deputy Chief Minister

    पुणे : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा देखील अपुऱ्या पडत आहे. यावरुन राज्यातील नेते केंद्रावर दुजाभावाचा आरोप करत आहेत. दुसरीकडे, आम्ही राज्याला गरजेएवढे वैद्यकीय साहित्य उपलब्ध करुन दिल्याचे केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, आरोग्य सुविधांवरून राज्य आणि केंद्र असा वाद रंगत असतानाच पुण्यात पीएम केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर खराब निघाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    याबाबत ससून रुग्णालयाचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आढावा बैठकीत तक्रार केली आहे.

    पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर सारखे बंद पडतात, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेनं चालत नसल्याने धूळ खात पडून असल्याचे डॉ. मुरलीधर तांबे यांनी म्हटले आहे. यामुळे व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र सरकारकडूनच ससूनला व्हेंटिलेटर मिळाले होते. मात्र हे व्हेंटिलेटर बंद पडत असल्याने निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

    भाजपाचे सरकारने नसल्याने अन्याय

    महाराष्ट्रात बिगर भाजप सरकार असल्याने केंद्र सरकार राज्यावर अन्याय करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे केंद्राकडून आरोग्य सुविधा पुरवताना कचराई करण्यात येत आहे, असेही या नेत्यांचे म्हणणे आहे. आधीच लसीवरून आरोपप्रत्यारोप सुरू असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासोबत दुजाभाव करण्यात येत असल्याचे म्हटले होते. त्यांनी आकडेवारीसह हा दावा केला होता. त्यात आता केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटरच खराब आल्याचे समोर आले आहे.

    नांदेडमध्ये ऑक्सिजनचा साठा अपुरा

    नांदेडमध्ये कोविड रुग्णांत झपाटात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयातील ऑक्सिजनचा उपलब्ध साठा येत्या काही तासात संपणार असून त्यामुळे कोरोनाबाघित रुग्णांना चक्क घरी पाठवले जात असल्याची धक्कादायक माहिती रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.वाय एस. चव्हाण यांनी दिली आहे. तसेच, रुग्णालयातील खाटाही भरल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावत असल्याची माहितीही समोर येत आहे.