नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली,  नवा मुठा उजवा कालवा फुटण्यापासून रोखला

लोणी काळभोर : नागरिकांच्या सावधानतेमुळे नवा मुठा उजवा कालवा फुटण्याचा धोका दूर झाल्याने शेतकरी व नागरिकांचे होणारे  संभाव्य नुकसान टळले आहे. यासाठी जलसंपदा व पोलीस प्रशासनाने युध्दपातळीवर हालचाली केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

खडकवासला धरणापासून निघालेला नवीन मुठा उजवा कालव्याच्या माध्यमातून हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील तालुक्यातील सुमारे ६६ हजार हेक्टर शेतीला पाणी पुरवले जाते. गेल्या अनेक वर्षापासून या कालव्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा कालवा अचानक फुटतो व परिसरातील शेतकरी व नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. सोमवारीही ही तसाच होणारा प्रकार परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला.

लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.रुपनरवस्तीकडे जाणार्या रस्त्यावर कालव्या खालून जाण्यासाठी एक पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंना कालव्याच्या मातीच्या भरावाला आधारदेण्यासाठी दगडाचे अस्तरीकरण करण्यात आलेले आहे. या अस्तरीकरणातील काही दगड निखळ कालव्यातील पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ माहिती दिली. माहिती मिळताच जलसंपदा विभाग व लोणी काळभोर पोलीसांनी तात्काळ हालचाली केल्याने होणारे संभाव्य नुकसान टळले.

घटनास्थळाला लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, उपनिरीक्षक एस ए बोरकर, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता विजय पाटील, उपविभागीय अभियंता पोपटराव शेलार, भक्ती वाकळे, हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर काळभोर,शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर,सरपंच अश्विनी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळभोर यांनी भेट दिली.