कारमधून सुरु होती गावठी दारूची वाहतूक; पोलिस आले अन्…

    दौंड : दौंड, भीमनगर, शिरापूर रोड (ता. दौंड) येथे स्विप्ट कारसह गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्यास ताब्यात घेऊन सुमारे चार लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

    सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, अभिजित एकशिंगे, दगडू विरकर यांचे पथक दौंड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना शिरापूर-दौंड रोडने एक कार (एमएच ४२ के ६५८८) ही संशयास्पदरित्या भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून भीमनगर येथे अडविली. कारचालक चालक बाळासाहेब अशोक दळवी (वय ३७, रा. मलटण, ता. दौंड, जि. पुणे) यास खाली उतरवून कारची झडती घेतली असता कारच्या पाठीमागील डिकीमध्ये ट्रक टायरच्या दोन ट्यूबमध्ये लपविलेली १२० लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली.

    दारूसाठा कुठून आणला?

    मुद्देमाल व कार असा चार लाख सहा हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला. यााबाबत पोलीस नाईक गुरू गायकवाड यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गावठी दारूसाठा कोठून आणला? तो कोठे विक्रीसाठी नेणार होता? याचा पाेलीस शाेध घेत आहेत. दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार पुढील तपास करीत आहेत.