आपटी गावच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून केली रस्त्याची डागडुजी

भिमाशंकर: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आपटी येथे मागील वर्षी ते ठाकरवाडी गंगापुर खुर्द, या रस्त्याच्या मुरमीकरणाच झाल होत.

 भिमाशंकर: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आपटी येथे मागील वर्षी ते ठाकरवाडी गंगापुर खुर्द, या रस्त्याच्या मुरमीकरणाच झाल होत. मात्र गेल्यावर्षीच्या पहिल्या पावसातच या रस्त्याचा काही भाग तुटला व रस्त्याच्या मोऱ्या, गटारं तुंबून मातीने गाडल्या होत्या, त्याचं रस्त्यांच काम ग्रामस्थांनी श्रमदानाने डागडुजी करून वाहतुकीस योग्य केला असल्याचे समितीचे अध्यक्ष अविनाश गवारी व सचिव दत्ता गवारी यांनी सांगितले.

-रस्त्यांच्या कामासाठी निधीची गरज
आपटी येथील रस्त्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दोन वेळा केलेली आंदोलने व सततच्या पाठपुराव्यामुळे गावात मागील वर्षी आपटी ते ठाकरवाडी गंगापुर खुर्द, या रस्त्याच मुरमीकरणाच काम झाले. यावर्षी शासनाने रस्त्याच्या पुढील कामासाठी निधी टाकला नव्हता मात्र रस्त्याची डागडुजी करणे अत्यंत गरजेचे होते. अन्यथा कधी नव्हे तो झालेला रस्ता पावसाळयात खराब होऊन नंतर रस्ता रस्त्याने पायीसुध्दा येणे अश्यक्य झाले असते. हा धोका ओळखून गावातील सर्व लोकांनी एकत्र येवून रस्ता दुरूस्त करण्याचा निर्णय घेतला.
रस्त्याच्या कामासाठी निधीची गरज होती. त्यासाठी यात्रेची वर्गणी दरवर्षीप्रमाणे गोळा केली. पुणे व मुंबई येथे राहणा-या नोकरदार नागरिकांनीही जमेल तेवढी आर्थीक मदत जमा करून गावाला पाठवून दिली. या वर्षी नव्याने स्थापन झालेल्या युवकांच्या ग्रामविकास समितीने गावातील जुन्या जाणत्या कारभारी मंडळींच्या मार्गदर्शनाने रस्त्याच्या कामासाठी जेसिबी ठरवून कामाला सुरूवात केली. दहा दिवसांच्या कामात गावातील सर्व नागरिकांनी श्रमदान केले. यामध्ये रस्त्याच्या कडेने गटार खोदणे, गाडलेल्या मो-या खुल्या करणे, तुटलेल्या रस्त्यावर बांध घालणे. रस्त्याची डागडुजी करणे आदी कामे पुर्ण केली.