राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करण्याचा प्रकार म्हणजे निव्वळ चमकोगिरी, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची टिका!

महापालिकेची जबाबदारी लक्षात घेवुन दि. ६ एप्रिल २०२१ रोजी ७५०० रेमडिसिव्हीर इंजेक्शन पुरवठा करणेसाठीचा खरेदी आदेश संबधित पुरवठादारास देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयामध्ये रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा कुठेही तुटवडा निर्माण झालेला नाही.

    पिंपरी। खाजगी रुग्णालयांमध्ये सर्रासपणे कोविड रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्शन दिले जात असल्याने सदर इंजेक्शनची मागणी वाढत चालली असुन त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील औषध विक्री दुकानांमध्ये रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. ही बाब राज्यशासनाला माहित असतानासुध्दा त्यांच्याकडुन कुठलेही निर्बंध लावले जात नसल्याने हा सर्व प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही सर्व परिस्थिती माहीत असताना सुध्दा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी आंदोलन करणे हा प्रकार म्हणजे निव्वळ चमकोगिरी असल्याची टिका सत्तारूढ़ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.

    पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे दरदिवशी सुमारे ३००० च्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या रुग्णालयाव्यतिरिक्त शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रामाणात कोविड – १९ रुग्ण दाखल करण्यात येत आहेत. रुग्णसंख्या वाढल्यामुळे शहरातील बऱ्याच रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्शनची गरज भासु लागली आहे. परंतु शहरातील खाजगी औषध दुकानदारांनी रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या बाबतीत कृत्रिम तुटवडा निर्माण केलेला आहे. तथापि आज अखेर महापालिकेच्या सर्व रुग्णालयासाठी भांडार विभागामध्ये ९०० रेमडिसिव्हीर इंजेक्शन शिल्लक आहेत. तसेच तातडीची बाब म्हणून बाहेरुन वाढीव २०० रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन घेण्यात आले असुन असे ११०० रेमडिसिव्हीर इंजेक्शन सध्या महापालिकेकडे उपलब्ध आहेत. हे इंजेक्शन महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांसाठी आवश्यक्तेनुसार मोफत दिली जात आहेत. महापालिकेची जबाबदारी लक्षात घेवुन दि. ६ एप्रिल २०२१ रोजी ७५०० रेमडिसिव्हीर इंजेक्शन पुरवठा करणेसाठीचा खरेदी आदेश संबधित पुरवठादारास देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयामध्ये रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा कुठेही तुटवडा निर्माण झालेला नाही.

    वास्तविक पाहता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असुन ते कोविड नियंत्रणामध्ये सपशेल अपयशी ठरल्याचे दिसुन येते. रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा करणे ही जबाबदारी राज्यशासनाची असुन त्यांचे खाजगी औषधे वितरकांवर कुठलेही नियंत्रण न राहिल्याने राज्यात रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण झालेला आहे. यावरुन राज्य सरकारचे एकंदरीत कोविड परिस्थितीवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. खरंतर राष्ट्रवादीने आंदोलने करण्यापेक्षा या गोष्टीचे राजकारण न करता शहरातील खाजगी रुग्णालयातील कोविड रुग्णांची होणारी धावपळ लक्षात घेवुन रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या संदर्भातील बाब त्यांच्याच पक्षाच्या असणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देवुन यावर योग्य तो तोडगा काढणे अपेक्षित आहे. परंतु राष्ट्रवादीचे पदाधिकारी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याऐवजी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करुन जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.