फिटनेस सर्टिफिकेटसाठी मजूराना मोजावे लागतात पैसे

पुणे : परप्रांतीयांना गावी परतण्यासाठी करोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे.

 फिटनेस सर्टिफिकेटसाठी प्रति व्यक्‍ती ३०० ते ५०० रुपये आकारणी

विभागीय आयुक्‍तांच्या सूचनेलाही हरताळ
पुणे : परप्रांतीयांना गावी परतण्यासाठी करोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. मात्र, मजुरांना हे प्रमाणपत्र देण्यासाठी काही डॉक्‍टर ३०० ते ५०० रुपये घेत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. एका कुटुंबात साधारणपणे चार व्यक्ती असतात. त्यामुळे मजुरांना बाराशे ते दोन हजारांचा भुर्दंड पडत आहे.
करोनाच्या भीतीमुळे आणि रोजगार बंद असल्याने परप्रांतीय मजूर आपल्या राज्यात जाण्यास इच्छुक आहे. या मजुरांना त्यांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता परराज्यात जाण्यासाठी रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला अशी करोनाची लक्षणे नसल्याचे प्रमाणपत्र डॉक्‍टरांकडून घेण्यासाठी मजुरांची रुग्णालयांत गर्दी होतानाचे चित्र सर्वत्र आहे. ठराविक दवाखानेच सुरू असल्याने काही डॉक्‍टर या मजुरांकडून 300 ते 500 रुपये घेत असल्याच्या तक्रारी येत आहे. हे चित्र प्रामुख्याने ग्रामीण भागात आणि उपनगरांमध्ये दिसत आहे.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी “या मजुरांना मेडिकल प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्‍टरांनी कमी फी घ्यावी,’ असे आवाहन डॉक्‍टरांना केले होते. मात्र, त्यास काही डॉक्‍टरांनी प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
-काहीही करून गावी परतायचे आहे
मी खडकवासला परिसरात राहात आहे. माझ्या कुटुंबात चार व्यक्ती आहे. मला उत्तर प्रदेश येथे जायचे आहे. मेडिकल प्रमाणपत्र घेण्यासाठी येथील डॉक्‍टरांनी प्रति व्यक्ती ३०० रुपये प्रमाणे फी घेतली. काहीही करून गावाला जायचे आहे, त्यामुळे इतकी फी देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, अशी कैफियत एका मजुराने मांडली.