प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

गॅरेज समोर पार्क केलेल्या आठ वाहनांची तोडफोड करून एका मोटारीतून कारटेप चोरून नेला. या दोन्ही घटनांप्रकरणी टोळक्यावर दरोड्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन जणांना अटक केली आहे.

    पिंपरी: पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लोखंडी रॉडचा धाक दाखवून खिशातून रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर वाहनांची तोडफोड केली. तसेच एका गॅरेज समोर पार्क केलेल्या आठ वाहनांची तोडफोड करून एका मोटारीतून कारटेप चोरून नेला. या दोन्ही घटनांप्रकरणी टोळक्यावर दरोड्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन जणांना अटक केली आहे.

    सागर सुनील शहा (वय २१, रा. मोहननगर, चिंचवड), अविनाश गोपाळ हरिजन उर्पâ अविनाश टाक (वय २१), मुकेश गणेश प्रसाद (वय २१, दोघे रा. मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. सागर पोळ, किरण वाघमोडे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पहिल्या प्रकरणात काशीफ आरिफ खान (वय २७, रा. काळभोरनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी खान यांचे बॉम्बे सुपारी या नावाने दुकान आहे. दुकानाचे शटर चोरटे उचकटत आहेत, अशी माहिती खान यांना मिळाली. त्यामुळे खान मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास त्यांच्या दुकानाकडे जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना रस्त्यात गाठून जीवे मारण्याची धमकी दिली. धक्काबुक्की करून रॉडचा धाक दाखवून खान यांच्या खिशातून २ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. रस्त्यावर दांडके आणि रॉड घेऊन गोंधळ घातला.

    दुसऱ्या प्रकरणात राजेश सुधाकर क्षीरसागर (वय ४०, रा. रस्टन कॉलनी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी क्षीरसागर यांचे काळभोरनगर पिंपरी येथे गणेश ऑटोमोबाईल्स नावाचे गॅरेज आहे. त्यांच्या गॅरेजसमोर दुरुस्तीसाठी लावलेल्या आठ गाड्यांवर दगड, सिमेंट ब्लॉक मारून नुकसान केले. त्यातील एका मोटारीतून १५ हजार रुपये किमतीचा कारटेप चोरून नेला. त्यानंतर दांडके आणि रॉड घेऊन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.