राज्य सरकारमध्ये ताळमेळ नाही; रामदास आठवलेंची टीका

    पुणे : प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी देशाची २०२१ सालची जनगणना ही जातनिहाय झाली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात न्याय देता येईल, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. शिवसेनेेने राजकीय नुकसान टाळण्यासाठी भाजपसाेबत यावे, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. तसेच राज्य सरकारमध्ये ताळमेळ नाही, असेही ते म्हणाले.

    मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षणाच्या विषयाच्या संदर्भात बाेलताना आठवले यांनी देशातील क्षत्रिय समाजाला केंद्रातील विविध याेजनात आरक्षण मिळावे अशी मागणी यापूर्वी केल्याचे नमूद केले. आरक्षणासाठी जातनिहाय जनगणना हाेणे गरजेचे आहे. अशी जणनगणना झाल्याने जातीयवाद वाढणार नाही, असे मला वाटते. जातनिहाय जनगणना झाल्यानंतर प्रत्येक समाजाला न्याय देता येईल. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारांना देण्याचा ठराव करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडे केल्याचे आठवले यांनी सांगितले.

    राज्य सरकारमध्ये ताळमेळ नाही

    राज्य सरकारवर टीका करताना आठवले यांनी या सरकारमध्ये ताळमेळ नसल्याची टीका केली. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले हे राेज वेगवेगळी विधाने करीत आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक झाली तर महाविकास आघाडीच्या आमदारांची मते फुटतील, अशी भिती असल्यानेच ती पुढे ढकलली जात आहे. शिवसेनेने देखील राजकीय नुकसान टाळण्यासाठी पुन्हा भाजपसाेबत यावे. अजूनही वेळ गेलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी भाजपबराेबर यावे, असे मत त्यांनी मांडले.